कत्तलखान्याच्या बातमीवरून जमावाने सोलापुरातील पत्रकारावर केला प्राणघातक हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 08:38 PM2018-12-08T20:38:34+5:302018-12-08T20:42:09+5:30
सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर ...
सोलापूर : शहरात सुरू असलेल्या अवैध कत्तलखान्यासंदर्भातील वृत्त वाहिनीवरून प्रसारित केल्याच्या कारणावरून शनिवारी सोलापुरात एका जमावाने पत्रकारासह त्याच्या मित्रावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. विजापूर वेस परिसरात अगदी भर रस्त्यावर ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
हल्यामधील जखमींमध्ये विजयकुमार रामचंद्र बाबर (३६ वर्षे, रा. दमानीनगर) आणि जावेद अब्दूल सत्तार शेख (३५ वर्षे, रा. शुक्रवारपेठ) यांचा समावेश आहे. विजयकुमार हे एका खाजगी वाहिनीचे पत्रकार असून जावेद हे सामाजिक कार्यकर्ते आहेत.
बाबर यांनी शहरातील कत्तलखान्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी वृत्त दिले होते. त्यावरून पोलिसांनी कारवाई करून जनावरांनी सुटका केली होती. दरम्यान, शनिवारी दुपारी १२.३० वाजताच्या हे दोघेही विजापूर वेस परिसरातील स्टार हॉटेलमध्ये चहा पित असताना सुमारे ३० ते ३५ जणांचा जमाव तिथे आला. त्यातील अनेकांच्या हातात रॉड, दांडके होते. त्यांनी या दोघांवरही जीवघेणा हल्ला केला. ते गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडल्यावर जमाव पसार झाला.
या दोघांनाही सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.