चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 03:18 PM2020-10-01T15:18:16+5:302020-10-01T15:20:42+5:30
दक्षिण तालुक्यातील कुंभारी येथील घटना; शेळी चोरण्यासाठी आल्याचा आरोप; हाडं मोडेपर्यंत मारहाण
सोलापूर : शेळी चोरण्यासाठीचोरांची टोळी आली म्हणत चार जणांनी मिळून हल्ला चढवून एका तरुणाला जमावानं झाडाला उलटं लटकावून बरगड्याचे हाड तुटेपर्यंत मारहाण केली. यामुळे अज्ञात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. मंगळवारी मध्यरात्रीच्या दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ही घटना घडली.
मयत तरुणाचे वय ३५ वर्षांच्या आसपास आहे. याबाबत कुंभारीच्या चौघांविरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, अण्णाराव पाटील यांच्या कुंभारीतील शेतात शेळी फार्मिंग आहे. तेथे मंगळवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास हा अज्ञात तरुण आला. तेव्हा कुत्रे जोरजोरात भुुंकू लागल्याने पाटील यांना जाग आली. मयत संशयित तरुण शेळी पळवून नेण्याच्या प्रयत्न करत होता तेव्हा आरोपी गेनसिद्ध सिद्धप्पा माळी, अण्णाराव सोमलिंग पाटील, ओगसिद्ध ऊर्फ योगेश भीमप्पा आमसे, बरगली ऊर्फ बाबूशा शिवप्पा बन्ने (सर्व रा. कुंभारी ता. द. सोलापूर) यांनी मयत तरुणाला पकडून लाकडी बांबू, काठ्यांनी त्याच्या डोक्यावर, बरगड्यावर, बेदम मारहाण केली.
दरम्यान, मयत तरुण बेशुद्ध पडला तेव्हा या घटनेची माहिती जिल्हा ग्रामीण पोलीस कंट्रोलला कळविल्यानंतर वळसंग पोलीस घटनास्थळी धावले. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल केले. उपचारापूर्वी तो मयत झाला. याबाबत मारहाण करणाºया सर्व आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदवून फौजदार ख्वाजा मुजावर यांनी त्यांना अटक केली. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मानगावे करत आहेत.
हॉस्पिटलमध्ये उपचारापूर्वीच मृत
ग्रामीण पोलीस कंट्रोलवरून वळसंग पोलिसांना निरोप आल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. तेव्हा ‘तो’ तरुण झाडाला बांधलेल्या अवस्थेत उलटे लटकताना आढळला. त्याला पोलिसांनी उपस्थितांच्या मदतीने खाली उतरवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पण उपचारापूर्वीच तो मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदनाच्या वेळी त्या तरुणाच्या शरीरावर मोठ्या जखमा दिसून आल्या. त्याच्या शरीरातील अनेक भागाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे दिसून आले.
‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं’
आरोपींनी संशयित चोराला पकडल्यानंतर त्याला विचारणा केली असता त्या तरुणाने ‘मैं पूने से आया हूं, मेरे साथ तीन लोग हैं, वो सब भाग गये’, असे तो संशयित चोर म्हटल्याची माहिती सूत्रांनी दिली.
पोलिसांची शोधमोहीम
मयत तरुण हा आपल्यासोबत तीन साथीदार आहेत असे सांगत होता, असे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, पण त्याच्यासोबत त्याचे साथीदार होते की नाही याचा तपास पोलीस करत आहेत. त्यावेळी आरोपींनी त्या तरुणास मारण्यासाठी काठ्या, लाकडे असे जे साहित्य वापरले ते पोलिसांनी जप्त केले आहे. संबंधित प्रकार नेमका काय आहे यासाठी वळसंग पोलिसांनी शोधमोहीम जारी ठेवली आहे. दरम्यान अटक केलेल्या चौघांच्या जाबजबाबातून आणखी माहिती पुढे येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.