करमाळ्यात मोबाईल तपासणी धडक मोहीम
By Admin | Published: June 8, 2014 12:50 AM2014-06-08T00:50:37+5:302014-06-08T00:50:37+5:30
आक्षेपार्ह फोटो: मजकुराबाबत पोलीस सतर्क
करमाळा : महापुरुषांची अश्लिल छायाचित्रे स्टोअरेज करणे व पुन्हा ते शेअर करणे या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता़ या प्रकाराने तणाव निर्माण होत असल्याने करमाळा पोलिसांनी आज शहरात ठिकठिकाणी उभे राहून तपासणी करून अश्लिल फोटो, आक्षेपार्ह मजकूर असणाऱ्या मोबाईलधारकांची कानउघाडणी केली़ ते फोटो, मजकूर डिलीट करण्याची मोहीम राबविली.
फेसबुक या सोशल नेटवर्किंग वेबसाईटवर महापुरुषांची अश्लिल छायाचित्रे टाकल्यानंतर राज्यात गेल्या आठवड्यात दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. सध्या मोबाईलवरून हॉट्सअप व एसएमएसद्वारे ही अश्लिल चित्रे स्टोअर करून पुन्हा एकमेकांना ती शेअर करून अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे़ परिणामी कायदा सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी करमाळा उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पाटील यांनी आज बसस्थानक, सुभाष चौक, बायपास रस्ता, भवानी चौक आदी ठिकाणी पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, उपनिरीक्षक भुवनेश्वर घनदाट यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा तैनात करून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या मोबाईलची तपासणी करून आक्षेपार्ह छायाचित्रे व मजकूर स्टोअर आहे का याची खात्री करून तपासणी केली व ज्यांच्या मोबाईलमध्ये असे आक्षेपार्ह चित्रे व मजकूर आढळून आला त्यांची कानउघडणी करण्यात आली़ ही मोहीम सायंकाळपर्यंत चालूच होती.
----------------------------
मोबाईलमध्ये आलेल्या महापुरुष व राजकीय नेत्यांचे अश्लिल छायाचित्रे व मजकूर स्टोअर करून ठेवू नये अथवा तो दुसऱ्या कोणा व्यक्तीला शेअर करू नये यामुळे विनाकारण तणाव निर्माण होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तसे आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- अनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी