हॉस्पिटलमधील मोबाईल मॅनर्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 06:50 PM2019-04-02T18:50:07+5:302019-04-02T18:50:27+5:30

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अगदी सहज दिसावेत असे बोर्ड लावलेले असतात, हॉस्पिटलमध्ये येताना मोबाईल बंद करा किंवा व्हायब्रेटर मोडवर ठेवा म्हणून. ...

Mobile managers in the hospital | हॉस्पिटलमधील मोबाईल मॅनर्स

हॉस्पिटलमधील मोबाईल मॅनर्स

googlenewsNext

प्रत्येक हॉस्पिटलमध्ये अगदी सहज दिसावेत असे बोर्ड लावलेले असतात, हॉस्पिटलमध्ये येताना मोबाईल बंद करा किंवा व्हायब्रेटर मोडवर ठेवा म्हणून. पण ते ऐकतील तर ते सोलापूरचे पेशंट कुठले? असेच हॉस्पिटलमधल्या मोबाईलच्या दुरुपयोगाचे हे किस्से.
दुपारचे १ वाजले असतील. ओपीडी चालू होती. पुढचा पेशंट आत आला, धाडकन दरवाजा ढकलून. काही पेशंटची देहबोलीच मजेशीर असते. महाशय हातात मोबाईल धरून उंचावत दरवाजातून आत आले. पटकन् मोबाईल माझ्यासमोर धरला आणि म्हणाले, बोला. मला हेच कळेना की त्यांना नक्की काय अभिप्रेत आहे. 

मी विचारलं, नक्की कोणाशी बोलायचे आहे? ‘ते ...डॉक्टर वो. तेनिच तुमच्याकडं पाठवलंय मला.’ आता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. ज्या डॉक्टरांनी या रुग्णाला माझ्याकडे पाठविले होते, त्यांच्याशी मला बोलावयाचे होते. पण अर्थातच हा रुग्ण मी अजून तपासला नसल्यामुळे त्याच्याबद्दल मला काहीही माहिती नव्हती. 

मी सत्य परिस्थिती त्या डॉक्टरांना सांगितली. नंतर फोन करतो असे सांगितले आणि फोन बंद केला. ‘मंग , किती खर्च येईल आॅपरेशनला?’ या रुग्णाचा पुढचा प्रश्न. आता मात्र मला हसावे का रडावे ते कळेना. बाजारात तुरी अन्....’. ‘अहो, मला तपासू तरी द्या तुम्हाला! ‘आता डॉक्टरनी सांगितलं  की तुम्हाला , मला हर्निया झालाय ते.’ हो, पण सगळे हर्निया सारखे नसतात. मला तपासल्याशिवाय काहीही सांगता येणार नाही. त्यासाठी पहिल्यांदा ओपीडी पेपर करावा लागेल तुम्हाला. ‘ मला एव्हाना हे लक्षात आले होते की मोबाईल फोनच्या सहाय्यानं, रिसेप्शनिस्टला गंडवून, साहेब पैसे न भरता, ओपीडी पेपर न करता, आत घुसले होते. ‘ते बेंबीवर लिंबाएवढी गाठ आहे बघा. खर्च किती येतंय तेवढं सांगा फकस्त,मग करु की आॅपरेशन.  चिकाटी दांडगी लावली होती साहेबांनी. मी पण त्याला न बळी पडता पुन्हा बाहेर पाठविले. पेपर करायला लावला. पैसे भरायला लावले, तपासले, आजाराबद्दल,  आॅपरेशनबद्दल माहिती सांगितली आणि मगच खर्च सांगितला.

मोबाईलचे असे अनेक दुरुपयोग पेशंट डॉक्टरांच्या बाबतीत करीत असतात. बºयाचवेळा रात्री साडेअकरा वाजता फोन येतो. ‘काय डॉक्टर, हॉस्पिटलमध्ये हायेत का?’ आता रात्रभर डॉक्टर थोडेच हॉस्पिटलमध्ये राहणार? मग पुढचा डायलॉग येतो ‘माझं पाठवलेलं व्हॉट्सअ‍ॅप बघून उत्तर दिला नाहीत ते? जरा अर्जंट हुतं’ साहेबांच्या दूरच्या  कुठल्यातरी नातेवाईकांचे रिपोर्टस असतात ते. तेही अर्धवट. त्याच्या आधारे त्यांना रोगाचे निदान हवे असते. तेही अर्जंट. पेशंट न बघता फक्त रिपोर्ट पाहून. महत्त्वाचे म्हणजे खर्च किती येणार हे मुळात पाहिजे असते. उपचार तिसºयाच डॉक्टरांकडे करावयाचे असतात पण खर्च मी सांगावा अशी अपेक्षा असते.

रुग्ण तपासताना  रुग्णाच्या खिशातला मोबाईल मोठ्या आवाजात किंचाळत असतो  ‘आवाज वाढव डीजे तुला ...’ ‘मला अशावेळी हसणे कंट्रोल ठेवणे फारच जड जाते.  नेमका याचवेळी रुग्णाला का फोन येतो हे मला न उलगडलेले कोडे आहे.

 रुग्णाबरोबर येणारे नातेवाईक पेशंटची तपासणी करीत असताना मोबाईलवर चढ्या आवाजात ‘डॉक्टरकडे आलो होतो, हे प्रेमाने जगजाहीर करीत असतात. डॉक्टरसमोर बसून व्हॉट्सअ‍ॅपवरील मेसेजेस चेक करणे हा एक नातेवाईकांचा आवडता छंद. 
रिसेप्शन वा वेटींगमध्ये बसल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवरचे व्हिडिओ मोठ्या आवाजात लावणे वा आलेली गाणी ऐकणे हा जणू आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी बजावणारच अशी जणू चढाओढच लागलेली असते. स्त्रीरुग्णही त्यात कमी पडत नाहीत. रडणाºया लेकराला शांत करण्यासाठी त्याच्या हातात काही जंक फूड चघळायला देणे किंवा मोबाईलवर मोठ्या आवाजात कार्टून दाखविणे हेच फक्त त्या इमानेइतबारे करतात.

हॉस्पिटलमध्ये आपण स्वत:च्या कामासाठी आलेलो आहोत. पंधरा मिनिटे आपला मोबाईल बंद किंवा सायलेंट मोडवर ठेवण्याने जगबुडी होणार नाही हे रुग्ण वा नातेवाईकांच्या का बरे लक्षात येत नाही हेच कळत नाही. 

डॉक्टरांच्या समोर बसून मोबाईलवर बोलण्याने आपलाच तपासणीचा वेळ कमी होतो आहे, आपलेच नुकसान होणार आहे, निदान हे तरी चाणाक्ष रुग्णांच्या लक्षात यायला हवे का हेही आता मोबाईलवरच सांगायला हवं?
- डॉ. सचिन जम्मा
(लेखक लॅप्रोस्कोपीक सर्जन आहेत)

Web Title: Mobile managers in the hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.