संकटकाळी मोबाईल शेक करताच त्वरित मिळणार मदत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 05:08 PM2020-02-24T17:08:21+5:302020-02-24T17:10:26+5:30
तरुणी, महिलांच्या सुरक्षेसाठी अॅप : महिला दिनाला होणार लाँच
शीतलकुमार कांबळे
सोलापूर : सार्वजनिक ठिकाणी, प्रवास करताना किंवा इतर कोणत्याही जागी तरुणी, महिलांवर एखादे संकट येऊ शकते. अशा वेळी लगेच मदतीसाठी संपर्क साधणे अवघड असते. ही अडचण लक्षात घेऊन सोलापुरातील एका युवकाने मोबाईल अॅपची निर्मिती केली आहे. आठ मार्च रोजी महिला दिनाच्या औचित्याने हे अॅप लाँच होणार आहे.
महिलांच्या सुरक्षेसाठी या अॅपमध्ये तीन गार्डीयनची (पालक) नावे अॅड करता येतात. संकटाच्या काळात या गार्डीयनला मोबाईल शेक किंवा होम स्क्रीनवरील बटन दाबल्यास आपण अडचणीत असल्याचा मेसेज जातो. या मेसेजसोबतच मोबाईलचे लोकेशनही जाते. यामुळे गार्डीयनला आपली मुलगी कुठे आहे याची त्वरित माहिती मिळते. या अॅपमध्ये सायरनची देखील सोय करण्यात आली आहे. सायरनचे बटन प्रेस केल्यानंतर मोठ्या आवाजामध्ये तो वाजतो. यामुळे तरुणीच्या आसपास असणाºया लोकांना याची माहिती मिळते. यावरून ते कमीत कमी वेळेत मदत करू शकतात. याचे सगळ्यात वेगळे वैशिष्ट्य म्हणजे या अॅपला इंटरनेटची गरज नाही. इंटरनेटशिवाय आपल्या पालक ांना संकटात असल्याची माहिती पुरविता येते.
या अॅपसोबत दामिनी पथकाला जोडून घेण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. दामिनी पथकातील पोलीस हे शहरामध्ये अनेक ठिकाणी गस्त घालत असतात. अडचणीच्या वेळी त्यांची मदत होऊ शकते. पुढच्या टप्प्यामध्ये शहरातील सर्व पोलीस ठाणे व पोलीस चौकी यांचा फोन क्रमांक या अॅपमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. जेणे करून एखाद्या विशिष्ट ठिकाणी जवळच्या पोलीस ठाण्यातील पोलीस मदतीसाठी पोहोचू शकतील.
सोलापूरकरही करू शकतील मदत
या अॅपमध्ये सेल्फ हेल्प हे आणखी एक वैशिष्ट्य असणार आहे. यात सोलापूरकरही मदत करू शकतील. मोबाईल अॅपच्या निर्मात्यांनी यासाठी सोलापूरकरांना आवाहन केले आहे. स्वयंस्फू र्तीने स्वयंसेवक काम करतील. अडचणीच्या वेळी अॅपच्या माध्यमातून पालकांपर्यंत मेसेज पोहोचला, पण ते तिथे येऊ शकत नसल्यास किंवा १० मिनिटांपेक्षा जास्त काळ गेल्यास सेल्फ हेल्प हे फीचर उपयोगी पडणार आहे. अॅपमध्ये असलेले नोंदणीकृत सदस्य हे त्या तरुणीच्या मदतीला जाऊ शकतील. घटनेच्या आसपास असणाºया स्वयंसेवकांना लगेच जाणे शक्य होते.