पुरीच्या दरोड्यातील १३ आरोपींवर लावला मोक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:27 AM2021-07-07T04:27:55+5:302021-07-07T04:27:55+5:30
कुसळंब : पुरी (ता. बार्शी) येथील दरोड्यातील १३ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी ...
कुसळंब : पुरी (ता. बार्शी) येथील दरोड्यातील १३ आरोपींवर मोक्का लावण्यात आला आहे. आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी आपल्या संघटित टोळीमार्फत तर कधी एकट्याने लुटमारीचे प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली. याबाबत जयसिंग मोहन पवार (रामपुरी ता बार्शी) यांनी फिर्याद दिली आहे.
या गुन्ह्यात जयसिंह हे कुसळंब-पांगरी राज्य मार्गावर पुरी हद्दीत रात्री ट्रॅक्टरने नांगरणी करीत होते. दरोडेखोरांनी येऊन त्यांना मारहाण करून त्यांच्या ताब्यातील ट्रॅक्टर, नांगर व मोबाइल हिसकावले. त्यांना तेथेच बांधून टाकून दरोडेखोर पसार झाले. पांगरी पोलिसांना माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल यांनी तपासाची सूत्रे स्वतःकडे घेतली. पोलीस पथकाने २४ तासात तीन आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून चोरीस गेलेले ट्रॅक्टर, नांगर असा सहा लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुन्ह्यात वापरण्यात आलेला ट्रकदेखील पोलिसांनी हस्तगत करून गुन्हा उघडकीस आणला. आरोपीकडे अधिक तपास केला असता आरोपी व त्याचे इतर साथीदार यांनी आपल्या संघटित टोळीमार्फत तर कधी एकट्याने लुटमारीचे प्रकार केल्याचे तपासात उघड झाले आहे.
-----
गंभीर स्वरुपाचे गुन्हे
सोलापूर जिल्ह्यासह औरंगाबाद, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना या जिल्ह्यांमध्ये गंभीर गुन्हे केल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. अशा संघटित गुन्हेगारी कृत्यामुळे जिल्ह्यामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. या आरोपींवर वेळोवेळी कारवाई करूनही त्यांच्यात सुधारणा झाली नाही. ते जामिनावर सुटल्यानंतर अशा प्रकारचे हिंसक व गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या निदर्शनास आले. या आरोपीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ नुसार मोक्काअंतर्गत कारवाई करण्याबाबत आदेश काढले.
पुरावे गोळा करुन प्रस्ताव
पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा ग्रामीण व पांगरी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर तोरडमल, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण शिरसट पोलीस हेड कॉन्स्टेबल शैलेश चौगुले, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज भोसले, पोलीस नाईक पांडुरंग मुंडे, मनोज जाधव, पाटील, बोधनवाढ, कोडी, तडवी, काकडे, अर्जुन कापसे, भंडारवाड यांनी आरोपीविरुद्ध पुरावे गोळा करून तेरा आरोपींवर मोक्का लावण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूरचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे पाठवून मंजुरी घेतली. उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.