आधुनिक नवदुर्गा ; प्रतिकूल परिस्थितीत फळे विकून मुलाला बनविले पोलीस उपनिरीक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 10:59 AM2018-10-11T10:59:03+5:302018-10-11T11:02:00+5:30
विजय विजापुरे / शंभूलिंग आकतनाळ।
चपळगाव : प्रतिकूल परिस्थितीचा बाऊ न करता त्यावर मात करताना अनेक वेळा हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. मात्र एखादी गोष्ट ठरविली तर ठाम ध्येयाने पुढे जाता येते, याचे उदाहरण बºहाणपूर (ता. अक्कलकोट) येथील ताहेराबी मकानदार या महिलेने दाखवून दिले आहे. आपल्या मुलाला पोलीस उपनिरीक्षक बनविणाºया ताहेराबी या नवदुर्गेची कहाणी तितकीच संघर्षमय आहे.
ताहेराबी हुसेनशा मकानदार या सबंध पंचक्रोशीत डोक्यावर टोपली घेऊन बोरे, जांभूळ, आंबे व इतर फळे विकून संसाराचा गाडा चालवितात. आपल्या पतीसोबत मिळेल ते काम करतात. या कुटुंबात आजतागायत कोणीही सरकारी नोकरीत नाही. आपल्या मुलाने सरकारी नोकरी करावी, ही ताहेराबी यांची अपेक्षा. लग्न झाल्यापासून डोक्यावर घेतलेली टोपली अखंड ठेवून त्यांनी आपला मुलगा महिबूब याला शिक्षण व संस्कार दिले. याच आधारे महिबूब ठाण्यात नोकरी करतो. त्यांचा दुसरा मुलगाही भरतीपूर्व प्रशिक्षण घेतो आहे.
ताहेराबी मकानदार यांचे घर छपराचे होते.
पावसाळ्यात पडलेल्या पावसाने पाणी घरात पडायचे. अशा कठीण प्रसंगी महिबूब छोट्या भांडीने पाणी काढायचा, पण परिस्थितीवर तो कधीच रुसला नाही, ही गोष्ट सांगताना ताहेराबींना अश्रू आवरणे कठीण झाले. आज माझा छपरातील मुलगा पीएसआय झालाय, हा अभिमान मात्र त्यांच्या चेहºयावर दिसला. आपल्या संपूर्ण आयुष्यात ताहेराबी यांनी आपल्या मुलांना कधीच कामावर पाठवले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे महिलेचा हात असतो, हेच ताहेराबींनी जाणले. तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणाहून आणलेली फळे विकून संसाराचा गाडा चालविला. आधुनिक युगात एकत्र कुटुंबपद्धती संपत चालली असतानाही १५ जणांचे कुटुंब अबाधित ठेवण्यात ताहेराबींचे कर्तृत्व वाखाणण्याजोगे आहे. त्या बचत गटातही काम करतात. अल्पदरात अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना भात शिजवून एकप्रकारे समाजसेवेचे व्रत यांनी दाखवून दिले आहे.
स्व. गुडनशा हे ताहेराबींचे सासरे. समाजसेवक म्हणून त्यांनी संपूर्ण आयुष्यभर अन्नदान व इतरांना मदत करण्याची भावना जोपासली होती. प्रतिकूल परिस्थितीत आजदेखील हा वारसा पुढे नेत ताहेराबी व मकानदार कुटुंब हे समाजातील लोकांसाठी विविध प्रकारे मदत करतात, हे विशेष! कुटुंब आणि मुलांच्या जडणघडणीत ताहेराबींनी कोणाकडूनही आर्थिक मदत घेतली नाही. त्यांच्या डोक्यावर कर्जाचा एक रुपयाही नाही. महिबूबच्या जडणघडणीत हैदरशा मकानदार (काका), साहेरा मकानदार (काकू) यांच्यासह परिवारातील सदस्यांचादेखील हातभार आहे.
- घरात कोणीच सरकारी नोकर झाले नाही, ही खंत मनात ठेवून आपल्या मुलाला सरकारी नोकरी असावी या उद्देशाने ताहेराबी मकानदार यांनी डोक्यावर घेतलेली फळांची टोपली कायम राखली. आपला मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला याचा आनंद त्यांच्या चेहºयावर दिसतो. मुलांना कोणतेही कष्ट करावे लागू नये म्हणून स्वत:च त्या कार्यरत राहिल्या.