मोडनिंबचे कोविड सेंटर हाऊसफुल्ल; दुसरे सेंटर सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:27 AM2021-04-30T04:27:08+5:302021-04-30T04:27:08+5:30
आठ दिवसांपूर्वी मोडनिंब येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोडनिंब येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले, ...
आठ दिवसांपूर्वी मोडनिंब येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोडनिंब येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले, मात्र मोडनिंब व परिसरात वाढत्या रुग्णसंख्येमुळे ५० रुग्णांची सुविधा असलेल्या सेंटरमध्ये ६० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणांनी याची दखल घेऊन तत्काळ दुसरे सेंटर सुरू करावे, अशी मागणी मोडनिंब परिसरातील नागरिकांमधून होत आहे.
सध्या तुळशी, मोडनिंब, अरण, आढेगाव, परितेवडी, उजनी, जाधववाडी, लऊळ, शेटफळ, तेलंगवाडी या गावातील सुमारे ६० रुग्ण उपचार घेत आहेत. दाखल झालेल्या रुग्णाला १० दिवस विलगीकरण कक्षामध्ये देखरेखीखाली ठेवले जाते. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येते. या सर्व रुग्णांसाठी दोन स्नानगृह तयार केले असून महिलांसाठी एक व पुरुषांसाठी एक तर दोनच शौचालय आहेत. सर्व रुग्णांसाठी नाष्टा, चहा, सकाळी व संध्याकाळी जेवणाची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. रुग्णसंख्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यामुळे दुसरे सेंटर सुरू करणे गरजेचे असल्याचे कोरोना नियंत्रण समितीने तालुका वैद्यकीय अधिकारी शिवाजी थोरात यांना सांगितले आहे. त्यांनी दुसरे सेंटर सुरू करण्यासाठी होकार दिला आहे.
दुसरे सेंटर कधी सुरू होणार याबाबत आमदार बबनराव शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मी जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा करून मोडनिंब अथवा परिसरात विलगीकरण सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सध्या सुरू असलेल्या या सेंटरमध्ये मोडनिंब येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप पाटील, डॉ. शरद थोरात, अविनाश कांबळे, महावीर कांबळे, सचिन वाघमारे हे सर्वजण या सेंटरची देखभाल करत आहेत.