असंघटित कामगारांसाठीचा सोलापुरातील गृहप्रकल्प मोदी यांना भावला; मागविली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 10:31 AM2019-01-07T10:31:10+5:302019-01-07T10:34:31+5:30
महेश कुलकर्णी सोलापूर : ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सहभागातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे उभारण्यात येणारा रे नगर ...
महेश कुलकर्णी
सोलापूर : ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या सहभागातून दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे उभारण्यात येणारा रे नगर गृहप्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भावला असून, अशा प्रकारचे प्रकल्प देशभर उभे करण्यासाठी या प्रकल्पाची अधिक माहिती मागवून घेतली आहे. म्हाडाच्या अधिकाºयांमार्फत ही माहिती पंतप्रधानांकडे पोहोचविली जात आहे. बुधवारी पार्क मैदानात या प्रकल्पाची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
खालच्या घटकातील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. गेल्या पाच वर्षांत सरकारने हे धोरण आखलेले असताना सोलापुरात मात्र हा प्रयोग गेल्या २० वर्षांपासून सुरू आहे. कामगार नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी यापूर्वी १५ हजार घरे विडी कामगारांसाठी गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. कॉ. गोदुताई परुळेकर महिला विडी कामगार गृहनिर्माण संस्थेद्वारे १० हजार घरे आणि कॉ. मीनाक्षीताई साने गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून ५,१०० घरे बांधण्यात आली आहेत. या दोन प्रकल्पानंतर ४४ प्रकारच्या असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी ३० हजार घरांचा प्रकल्प सुरू केला आहे. (क्रमश:)
मोनोलिथिक तंत्रज्ञानाचा वापर
- आशिया खंडातील सर्वात मोठा गृहप्रकल्प म्हणून रे नगरकडे पाहिले जाते. कामगारांना स्वस्तात घरे देण्यासाठी आंतरराष्टÑीय पातळीचे मोनोलिथिक तंत्रज्ञान येथे वापरण्यात येत आहे. याद्वारे एकदाच १२ घरांचा सेट बनविण्यात येतो. यामध्ये भिंती आणि स्लॅब एकत्रित उभा होतो. अशी महिन्याला आठशे घरे पूर्ण होतात.
बांधकामासाठी आंतरराष्टÑीय पातळीवरील तंत्रज्ञान वापरल्यामुळे कामगारांना स्वस्तात आणि मजबूत घरे उपलब्ध होतील. लोकसहभागातून उभारण्यात येणाºया रे नगरच्या घरांची माहिती पंतप्रधानांनी मागविली आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीच्या अधिकाºयांना मी स्वत: माहिती देतोय.
- अंकुर पंधे, विकासक, रे नगर गृहनिर्माण संस्था