मोहिनी एकादशी: विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाख भाविक पंढरीत फुलला विठ्ठल भक्तांचा मळा
By admin | Published: May 11, 2014 12:11 AM2014-05-11T00:11:01+5:302014-05-11T00:11:01+5:30
पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते.
पंढरपूर : वैशाख महिन्यात शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झाले होते. मोहिनी एकादशीनिमित्त महाराष्टÑाच्या कानाकोपर्यांतून पंढरीत भाविक दाखल झाले होते. यामध्ये भाविकांनी रेल्वेने पंढरपूरला येणे पसंत केले होते. यामुळे रेल्वे स्टेशनकडून विठ्ठल मंदिराकडे भाविक जादा संख्येने येत होते. दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी झाली होती. दुपारी दर्शन मंडपाचे आठ गाळे भरुन धोंडोपंतदादा मठापर्यंत रांग पोहचली होती. विठ्ठलाला नेहमीप्रमाणे सर्व नित्योपचार करण्यात आले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी होत असलेली वाढती गर्दी पाहून स्टेशन रोड व प्रदक्षिणा मार्गावर किरकोळ व्यापार्यांनी दुकाने थाटली होती. जादा गर्दी असणार्या चौफाळा चौकात मागील तीन दिवसांपासून पोलीस चौकीचे बनकर पडल्याने भाविकांना मंदिराकडे ये-जा करताना अडथळा निर्माण होत होता. मोहिनी एकादशीनिमित्त ४,५०० भाविकांनी आॅनलाईन विठ्ठलाच्या दर्शनासाठी बुकिंग केले होते. यामध्ये १२०० भाविकांनी शुक्रवारी तर २७५० भाविकांनी त्यापूर्वी आॅनलाईन दर्शन बुकिंग केले होते. विठ्ठलाचे दर्शन घेऊन आलेल्या छोट्या दिंड्या प्रदक्षिणा मार्गावरुन फेरी मारुन जात होत्या. त्यामधील वारकरी जागोजागी भजन, कीर्तन केले जात होते. (प्रतिनिधी)
----------------------------------------
मोहिनी एकादशीचे महत्त्व
पूर्वी सरस्वती नदीकाठच्या भद्रावती नावाच्या नगरीवर ध्रुतिमान नावाच्या राजाचे राज्य होते. त्या नगरीत धनपाळ नावाचा धार्मिक सधन व्यापारी होता. त्याने जनकल्याणासाठी विहिरी, तलाव बांधले. त्याचबरोबर अनेक कामे केली. त्याला पाच मुले होती. त्यामधील चार मुले वडिलांप्रमाणे धर्म, नीती मानून वागणारी होती. तर पाचवा दुराचारी निघाला. व्यापार्याने त्याला घरातून हाकलून दिले. तो चोर्या करु लागला. त्याला अनेक वेळा राजसेवकांनी पकडले. परंतु त्याला व्यापार्याच्या चांगल्या वागणुकीमुळे सोडण्यात आले. परत त्याने मोठी चोरी केल्यामुळे त्याला राज्याबाहेर काढले. तो जंगलात गेला तेव्हा त्याला कष्टी जीवन जगावे लागले. त्याला पश्चाताप झाला. आपले आई-वडील, भाऊ ताठ मानेने जगतात, तसे आपण जगावे असे त्याला वाटले. याचवेळी त्याला अरण्यात कौंडिल्य ऋषी दिसले. त्याने त्यांच्यासमोर प्रांजळपणे सर्व अपराधाची कबुली दिली. तेव्हा ऋषी म्हणाले, मुला तू वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील मोहिनी एकादशी व्रत कर, तुझ्या पापांचा नाश होईल. त्याने एकादशी व्रत केल्याने त्याच्या पापांचा नाश झाला, अशी दंतकथा सांगितले जाते.