मोहिते-पाटलांची कलई केलेली भांडी निवडणुकीत चकाकली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 03:27 PM2019-06-07T15:27:06+5:302019-06-07T15:29:49+5:30
पण तुमची भांडी चायनीज का सिंगापूरची ?.. हे कळाले नाही; धैर्यशील मोहिते-पाटील याचा सवाल
लऊळ : लोकसभेच्या निवडणुकीत ‘आमची कलई केलेली भांडी लोकांनी स्वीकारल्याने ती चकाकली. मोहिते-पाटलांची भांडी गोरगरिबांच्या कामी येतात. पण ज्यांना ही भांडी कलई केलेली वाटली, त्यांची भांडी चायनाची का, सिंगापूरची आहेत, हेच आम्हाला अद्यापपर्यंत समजले नाही. आम्ही दिलेल्या शब्दाला जागतो व त्याप्रमाणे वागतो. लोकसभेच्या निवडणुकीत माळशिरसमधून लाखाचे लीड देऊ, सांगून तो देऊनही दाखविल्याचे शिवामृत दूध संघाचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सांगितले.
माढा तालुक्यातील रोपळे क. ग्रामपंचायतीच्या वतीने विविध विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. प्रथम ओढा सरळीकरण, महादेव मंदिर काँक्रीटीकरण, खाजा खलील भक्त निवास अशा गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन धैर्यशील मोहिते-पाटील, आ. नारायण पाटील व झेडपीचे माजी समाजकल्याण सभापती शिवाजी कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते.
यावेळी सरपंच तात्यासाहेब गोडगे, ज्येष्ठ नेते अॅड. बी. डी. पाटील, लेबर फेडरेशनचे माजी अध्यक्ष भारत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य व्यंकटेश पाटील, शशिकांत माळी, प्रहारचे जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, तालुकाध्यक्ष इंद्रजित आदलिंगे, कुर्डूवाडी शिवसेना शहराध्यक्ष समाधान दास, राज ढेरे, प्रवीण सोमासे, उपसरपंच बिरुदेव पवार, तंटामुक्तीचे अध्यक्ष शरद पाटील, तानाजी दास, नागनाथ मेहर, श्रीपाद दळवी, अशोक मेहर, जिजाबा कांबळे, आनंद गोडगे, अतुल दास उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद पाटील यांनी केले.
संजय शिंदेंचे पाय जमिनीवर नाहीत
मोहिते-पाटील म्हणजे स्लो पॉयझन आहे. ते कधी चढेल ते सांगता येत नाही. ते कोणाच्या नादी लागत नाहीत आणि नादी लागले तर ते सोडतही नाहीत. संजय शिंदे यांचे पाय जमिनीवर नाहीत. त्यांना सर्वसामान्यांचे काही देणे-घेणे नाही. कारखानदारी असल्याने त्यांना गोरगरीब जनता दिसत नाही, अशी टीका आ. नारायण पाटील यांनी केली.