ओलावा हटेना, मुळ्या वाढेनात, द्राक्षाचे घड गळू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:47 AM2020-12-05T04:47:34+5:302020-12-05T04:47:34+5:30
अक्कलकोट (जि. सोलापूर): पावसाने उघडीप देऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी जमिनीतील ओल हटत नाही. परिणामी झाडाच्या मुळ्या वाढत ...
अक्कलकोट (जि. सोलापूर): पावसाने उघडीप देऊन दीड महिन्यांचा कालावधी उलटला तरी जमिनीतील ओल हटत नाही. परिणामी झाडाच्या मुळ्या वाढत नसल्याने द्राक्षाचे घड आपोआप गळून पडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.
अक्कलकोट तालुक्यात जवळपास ७०० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे अजूनही जमिनीत क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओलावा टिकून राहिलेला आहे. त्यामुळे उभ्या झाडावरील घड गळू लागले आहेत. हा प्रकार बागायतदारांची चिंता वाढवित आहे. तालुक्यातील काही शेतकरी एकत्रित येत ग्रुप तयार केला. या सर्वांनी द्राक्षशेती करण्याचे नियोजन केले. त्यानुसार प्रत्येकाने बँक कर्ज मिळवून देण्यापासून ते मजूर पुरविणे, रोगराईवर औषध फवारणी, यंत्रसामुग्री देणे अशाप्रकारचे एकमेकांना साहाय्य करीत बागा फुलू लागल्या. शेतकऱ्यांच्या उत्पनात वाढ होत गेली. परिणामी द्राक्षबागांची संख्या वाढू लागली. पण गतवर्षी तालुक्यात द्राक्षमाल अत्यंत चांगल्या पद्धतीने आला. मात्र, कोरोनामुळे अपेक्षित दर मिळाला नाही. काही शेतकऱ्यांनी बेदाणा केला, तरी बँकेच्या कर्जावरील व्याजसुद्धा निघाले नाही.
यावर्षी अतिवृष्टीमुळे ऑक्टोबर महिन्यातील छाटणीला विलंब झाला. चित्रा नक्षत्राच्या पावसामुळे जमिनीत ओलावा अधिक प्रमाणात झाला. अजनूही वाफसा येईना. जमिनीतील अन्नद्रव्य घटक धुऊन गेले. जमिनीतील मुळ्या योग्य पद्धतीने वाढताना दिसत नाहीत. यामुळे यंदा द्राक्षाचे घड प्रमाणापेक्षा अधिक गळू लागले आहेत. एकूणच रोगराईवर नियंत्रण मिळविण्यासाठी औषधाचा खर्च करावा लागत आहे.