दलित महिलेचा विनयभंग, तरुणाविरुद्ध अॅट्रॉसिटी दाखल
By Admin | Published: July 29, 2016 10:28 PM2016-07-29T22:28:34+5:302016-08-01T12:44:09+5:30
दलित महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २९ : दलित महिलेचा विनयभंग करून तिला जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी एका तरुणाविरोधात मंद्रुप पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव (भीमा) येथे गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला होता.
पीडित महिलेने मंद्रुप पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पीडित महिला तेलगाव येथील असून ती शेतातील वस्तीवर सासू व सासरे, पतीसह राहते. गुरुवारी सासरे शेजारच्या शेतात कामाला गेले, सासू गावातील एका व्यक्तीच्या अंत्यविधीसाठी गेल्या तर पती अण्णाभाऊ साठे जयंतीच्या तयारीसाठी तेलगाव येथे गेले होते.
शेजारच्या शेतातील हणमंत रामा कुंभार (वय २२,रा. तेलगाव ) हा पीडित महिलेच्या घराजवळ पाळत ठेवून होता. घरात महिलेशिवाय कोणीही नाही याची खात्री पटल्याने तो तिच्या घरात शिरला. हणमंत कुंभार याने सदर महिलेचा हात धरुन तिच्याशी झोंबाझोंबी केली. महिलेने हात झटकून पळून जाण्याचा प्रयत्न केला असता, तिला जातीवाचक शिवीगाळ केली. झाल्या प्रकाराचा बोभाटा केल्यास तुला आणि तुझ्या घरातील माणसांना सोडणार नाही असा दम भरला. लज्जा वाटेल असे कृत्य केले. याचवेळी ती धावत घराबाहेर पडली. समोर दुचाकीवरुन एक व्यक्ती येत असल्याचे पाहून हणमंत कुंभार याने पोबारा केला अशी तक्रार सदर महिलेने पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अभय डोंगरे हे करत आहेत.
आरोपी जेरबंद
संशयित आरोपी हणमंत कुंभार याला शुक्रवारी दुपारी पोलिसांनी अटक केली असून, शनिवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.कोपर्डी प्रकरण राज्यभर गाजत असताना सोलापूर जिल्ह्यात तेलगाव येथे दलित महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. काही वर्षांपूर्वी याच परिसरात तेलगाव (सीना) ता.उत्तर सोलापूर येथे दलित महिलेवरील अत्याचाराचे प्रकरण राज्यभर गाजले होते.