माउली धावली सांगली पूरग्रस्तांच्या मदतीला !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2019 10:16 AM2019-08-12T10:16:28+5:302019-08-12T10:19:43+5:30
सांगली पूरग्रस्तांसाठी पंढरपूरच्या विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीने पाठविल्या पाच हजार साड्या
पंढरपूर : सांगली जिल्ह्यामधील पूरग्रस्त महिलांना मानवतावादी भूमिकेतून व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने ५ हजार साड्यांची मदत पाठविण्यात आली आहे. यामुळे पूरग्रस्त महिलांच्या मदतीला माउली धावली असल्याचे दिसून आले.
सांगली जिल्ह्यामध्ये पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हजारो कुटुंबांच्या घरांमध्ये पाणी आहे. यामुळे सांगलीतील नागरिकांना कपडे, राहणे व जेवण्याची समस्या निर्माण झाली आहे.
यामुळे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, सदस्य संभाजी शिंदे, हभप. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले व महिला सदस्या शकुंतला नडगिरे, अॅड. माधवी निगडे व साधना भोसले यांनी व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांना सांगलीतील पूरग्रस्त महिलांसाठी मदत म्हणून साड्या पाठविण्याचे निर्देश दिले होते.
त्यानुसार या साड्याचा टेम्पो सांगलीकडे मार्गस्थ झाला. त्याप्रसंगी मंदिरे समिती सदस्य शकुंतला नडगिरे, हभप जळगावकर महाराज, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड व मंदिरे समिती कर्मचारी उपस्थित होते.
रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या साड्या
- श्री रुक्मिणी मातेस अनेक महिला भाविक मोठ्या श्रद्धेने साडी-चोळी अर्पण करत असतात. यामुळे मंदिरे समितीकडे महिन्याला हजारो साड्यांचा साठा होतो. श्री रुक्मिणी मातेस अर्पण झालेल्या ५ हजार साड्या मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्या साड्या टेम्पोतून पाठविल्याचे मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.