गौरींच्या आगमनाचा मुहूर्त मंगळवारी दुपारी; विसर्जनही गुरूवारी दुपारी मूळ नक्षत्रावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:20 PM2020-08-21T12:20:36+5:302020-08-21T12:22:37+5:30
बाजारपेठेत खरेदीची लगबग : विविध धातू अन् प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे उपलब्ध
सोलापूर : विघ्नहर्त्या गणरायाचे २२ आॅगस्ट रोजी आगमन झाल्यानंतर तीनच दिवसांत म्हणजे मंगळवार दि. २५ आॅगस्ट रोजी गौरींचे आवाहन करण्यात येणार आहे. यासाठी घरोघरी तयारी सुरू असून, गौरीचे आवाहन मंगळवारी दुपारी १.५९ नंतर अनुराधा नक्षत्रावर करावे.
बुधवारी गौरी पूजन असून, मूळ नक्षत्रावर गुरूवारी दुपारी १२.३७ नंतर विसर्जन करावे, असे आवाहन पंचांगकर्ते मोहन दाते यांनी केले आहे. दरम्यान, गौरीचे मुखवटे, पूजचे साहित्य खरेदी करण्यासाठी आज दिवसभर मधला मारूती परिसरात महिलांची गर्दी दिसून आली.
दाते म्हणाले की, ज्येष्ठा नक्षत्र मध्यान्ह असलेल्या दिवशी गौरी पूजन करावे म्हणजेच बुधवार २६ रोजी नेहमीप्रमाणे गौरीपूजन करावे आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे आहे. गौरी आवाहन किंवा विसर्जनाकरिता ठराविक वेळेची मर्यादा नसते. मात्र यावर्षी आवाहन व विसर्जनाकरिता मर्यादा दिलेली आहे, त्या मर्यादेत कधीही आवाहन आणि विसर्जन करता येईल, असेही दाते यांनी सांगितले़
ज्येष्ठा गौरी, चैत्र गौरी, मंगळा गौरी, हरितालिका आणि नवरात्रात पार्वतीची पूजा केली जाते. श्रावणात मंगळागौरीसाठी माहेरी आलेल्या सासुरवाशीणी गणपती आणि गौरी सणासाठी माहेरी येत असतात. या दिवसात प्रत्येक घरात आनंदाचे वातावरण असते. या सणाच्या निमित्ताने बाहेरगावी नोकरी, व्यवसायासाठी राहिलेले कुटुंब आपल्या मूळ गावी येऊन हा सण साजरा करतात.
८०० ते ३००० रुपयांपर्यंत मुखवटे...
चालू वर्षी गौरींच्या मुखवट्यात सर्वाधिक मागणी शाडूच्या मुखवट्यांना असल्याचे दिसून येत आहे़ गौरींचे अखंड स्टँड (हिंडालियम बॉडी) बाजारात उपलब्ध आहेत़ साडेचार हजारांपासून यांची किंमत असते. मात्र ग्राहकांचा कल अॅल्युमिनियम, फायबर, लोखंडी स्टँड खरेदी करण्याकडे आहे़ प्लॅस्टर आॅफ पॅरिसचे मुखवटे २०० ते ४०० रुपये जोडी तर पितळी मुखवटे ८०० ते ३००० रुपयांपर्यंत बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत़ गौरी बसतात त्या मुहूर्तापर्यंत ग्राहक या सामानाची खरेदी करतात, असेही दुकानदार संग्राम यादव यांनी सांगितले़
बाजारपेठेत महिलांची गर्दी
गौरी-गणपती उत्सव जवळ आल्यामुळे सोलापूर शहर व जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या बाजारपेठा गौरींचे मुखवटे व शृंगार साहित्याने सजल्या आहेत़ यावर्षी नवनवीन प्रकारातील गौरींचे मुखवटे उपलब्ध आहेत. सोलापूर शहरातील नवीपेठ, टिळक चौक, जोडबसवण्णा चौक, कुंभार वेस, जुळे सोलापूर, कन्ना चौक, अशोक चौक आदी ठिकाणच्या मुख्य बाजारपेठांत साहित्य खरेदीसाठी महिलांची गर्दी वाढली आहे.
सजावटीचे साहित्य गौरींना बसविण्यासाठी आकर्षक मखरांना प्राधान्य दिले जाते. यंदा तयार मखरांबरोबरच घरी आपल्या आवडीनुसार मखर तयार करता यावेत, यासाठी साहित्यांची उपलब्धता विक्रेत्यांनी करून दिली आहे. स्पंजचे खांब, कापडी फुले, अशा विविध प्रकारच्या साहित्यांचा यात समावेश आहे. फराळाबाबतही असेच चित्र असून, फराळाचे साहित्य आणि तयार पदार्थ दोन्ही मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले आहेत. आपापल्या सोईने, आर्थिक बाजूचा विचार करून खरेदीस प्राधान्य दिले जात आहे.
गौराईसाठी १०० रुपयांपासून १५ हजारांच्या पुढे विविध प्रकारच्या साड्या बाजारात उपलब्ध असतात. यामध्ये जरी वर्क, टिकली वर्क, स्पार्कल वर्क, एम्ब्रॉयडरी, सिल्क बांधणी, पैठणीमध्ये नारायणी पैठणी, अपूर्वा सिल्क, चेन्नई सिल्क, इचलकरंजी पैठणी अशा हजारो प्रकारच्या विविध रंगी मनाला मोहून टाकणाºया साड्या गौरींसाठी बाजारात उपलब्ध आहेत़ सिल्क बांधणी, पैठणी, टिकली वर्क या साड्यांना अधिक मागणी महिला वर्गाकडून होत असल्याचे दिसून येत आहे़ याशिवाय दागिन्यांचीही खरेदी जोमाने सुरू आहे.