मम्मी-पप्पा तुम्ही काळजी घ्या, मी गावाकडे आनंदित...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2020 01:55 PM2020-04-13T13:55:55+5:302020-04-13T13:57:38+5:30
आई अन् वडील अत्यावश्यक सेवेत व्यस्त; अडीच वर्षांच्या चिमुकलीचा आजी-आजोबा करतात सांभाळ
नासीर कबीर
करमाळा : कोरोना प्रादुर्भावामुळे अनपेक्षित असे संकट तयार होऊन आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीचा फटका वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या प्रकाराने बसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीट (ता़ करमाळा) येथील ढेरे परिवारातील गौरवी या अवघ्या दोन वर्षे चार महिने वयाच्या चिमुकलीला कोरोनामुळे आई-वडिलांपासून दूर राहत आहे.
गौरवीचे वडील गौतम हरिश्चंद्र ढेरे हे पुणे जिल्ह्यातील मुंढवा, केशवनगर, सदाशिव पेठ येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. आई वर्षा ढेरे या निर्मलनगर पोलीस ठाणे, वांद्रे, मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा देत आहेत. सध्या ते दोघेही कोरोना विरोधातील लढ्यात सक्रिय असल्याने त्यांना गौरवीसाठी वेळ देता येत नाही. परिणामी गौरवीला वीट (ता. करमाळा) येथे आजी- आजोबांकडे ठेवण्यात आले आहे.
गेल्या महिनाभरापासून गौरवी ही आजोबा हरिश्चंद्र ढेरे व आजी सुमन ढेरे यांच्यासोबत वीट येथे राहत आहे. दरम्यान, मम्मी-पप्पांची गेल्या महिन्यापासून भेट झाली नसल्याने गौरवीला त्यांची ओढ लागली आहे़ मात्र, कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर जनतेच्या काळजीसाठी सेवा देणाºया तिच्या आई, वडिलांना तिची भेट घेता येईना़ अशा स्थितीत आजी अन् आजोबा लहानग्या गौरवीला आनंदी ठेवण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरताना दिसत आहेत.
कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होऊन सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत़ त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या स्तरातील नागरिकांना फटका बसला आहे. अनपेक्षितपणे विविध अडचणींशी तोंड द्यावे लागत आहे. अशा स्थितीत शासकीय सेवेत असणारे आई, वडील दोघेही कोरोना लढाईत सक्रिय असताना त्यांना चिमुकलीपासून दूर राहताना भावनिक संघर्षालाही तोंड द्यावे लागत असल्याचे गौरवीवरुन दिसून येत आहे. त्या चिमुकलीची अवस्था पाहून नागरिकांनी आतातरी घराबाहेर जाणे टाळले पाहिजे, असे सांगितले जाते.