आतापर्यंत आलेले पैसे खड्ड्यात, नवे पैसे येईपर्यंत सोलापूर शहर खड्ड्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 12:37 PM2021-08-12T12:37:10+5:302021-08-12T12:37:16+5:30
स्मार्ट सिटीच्या बैठकीची प्रतीक्षा : तरतूद झाली तरच नागरिकांचा त्रास कमी हाेणार
साेलापूर : स्मार्ट सिटी आणि अमृत याेजनेच्या काेट्यवधींच्या निधीतून नवी पेठ, दत्त चाैक खाेदूून ठेवण्यात आला आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी सुमारे २५ काेटी रुपयांची आवश्यकता असल्याचा स्मार्ट सिटीच्या तांत्रिक अधिकाऱ्यांचा अंदाज आहे. स्मार्ट सिटीच्या बैठकीत या निधीची तरतूद झाली तरच खड्डे बुजविण्यात येतील. अन्यथा खड्डे कायम राहतील, असे स्पष्टीकरण स्मार्ट सिटीचे अधिकारी देत आहेत.
स्मार्ट सिटी याेजनेतून शहरात १२ रस्ते व ड्रेनेजलाइनचे काम तीन वर्षांपूर्वी हाती घेण्यात आले हाेते. प्रस्तावित कामांशिवाय इतर ठिकाणी कामे करण्याची मागणी भाजप व काँग्रेसच्या नगरसेवकांनी केली. त्यामुळे इतर ठिकाणी कामे करण्याचा निर्णय स्मार्ट सिटीच्या सीईओंनी दाेन वर्षांपूर्वी घेतला. याचा फटका मूळ कामांना बसला आहे. मूळ कामांसाठी निश्चित केलेला निधी आता खर्च झाला आहे. नवी कामे करण्यासाठी तरतूद झालेली नाही. त्यामुळे दत्त चाैक ते शिंदे चाैक, नवी पेठ परिसरातील रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली आहेत. या कामांसाठी २५ काेटी रुपये लागतील असा अंदाज स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संदीप कारंजे यांनी व्यक्त केला; परंतु स्मार्ट सिटी कंपनी २५ काेटी निधी देण्यास तयार नाही. यापैकी काही निधी आम्ही देऊ. पण त्यासाठी स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे. स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक १३ ऑगस्ट राेजी आयाेजित करण्याचे नियाेजन सीईओ त्रिंबक ढेंगळे-पाटील केले हाेते; मात्र चेअरमन असीम गुप्ता यांच्याकडून मंजुरी मिळालेली नाही. जाेपर्यंत मंजुरी मिळत नाही ताेपर्यंत दत्त चाैक, नवी पेठेतील त्रास कायम राहणार आहे.
---
किती पैसे आले अन् गेले संचालकांना पत्ता नाही
स्मार्ट सिटीचे तज्ज्ञ संचालक टेंडर प्रक्रियेत गुंतले आहेत. महापाैर, सभागृह नेता, विराेधी पक्षनेता आणि गटनेत्यांपैकी एकालाही स्मार्ट सिटीला आजवर आलेला निधी आणि खर्ची झालेला निधी याबद्दल माहिती नसल्याचे दिसून येते. मूळ कामांशिवाय इतर ठिकाणी कामे करण्यात आली आहेत. त्याबद्दलही हे संचालक अनभिज्ञ आहेत.
स्मार्ट सिटी व अमृत याेजनेतील खाेदाईमुळे सहा नगरसेवकांच्या प्रभागातील रस्ते खराब झाले आहेत. या रस्त्यांच्या दुरुस्तीचे एकत्रित अंदाजपत्रक तयार नाही. मात्र प्राथमिक अंदाजानुसार ७ ते ८ काेटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या खर्चाला मंजुरी देण्याचा प्रस्ताव साेलापूर डेव्हलपमेंट काॅर्पाेरेशन कंपनीच्या लवकरच हाेणाऱ्या बैठकीच्या अजेंड्यावर आहे. बैठकीची तारीख निश्चित नाही.
- त्रिंबक ढेंगळे-पाटील, कार्यकारी संचालक, स्मार्ट सिटी.