सोलापूर-उस्मानाबाद रेल्वेच्या भूसंपादनाला मिळाला पैसा, बजेटमध्ये तरतूद?
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 2, 2023 10:07 PM2023-02-02T22:07:25+5:302023-02-02T22:10:26+5:30
केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डने ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली
बाळकृष्ण दोड्डी
सोलापूर : यंदाच्या अर्थसंकल्पात रेल्वे मंत्रालयाला २.४ लाख कोटी रुपये निधी मिळाला आहे. या भरघोस निधीचा फायदा सोलापूररेल्वेला होणार आहे. सोलापूर-उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्गाच्या भूसंपादनासाठी निधी उपलब्ध होणार आहे. तसेच मंजूर झालेला मुंबई ते हैदराबाद बुलेट ट्रेन सोलापुरातून धावणार असल्याची अपेक्षा या बजेटमुळे वाढली आहे.
केंद्रीय अर्थसंकल्प झाल्यानंतर रेल्वे बोर्डने ऑनलाइन पत्रकार परिषद घेतली. सोलापुरातील डीआरएम कार्यालयातून येथील अधिकारी या ऑनलाइन पत्रकार परिषदेला हजेरी लावली. यावेळी सोलापुरातील पत्रकार उपस्थित होते. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाचा अर्थसंकल्प मध्य रेल्वेसाठी खूपच दिलासा देणारा आहे. २.४ लाख कोटी निधी रेल्वेच्या विकासासाठी मिळाला आहे. या निधीतून सोलापूर, उस्मानाबाद नवीन रेल्वे मार्ग, फलटण पंढरपूर नवीन रेल्वे मार्गाला निधी मिळणार आहे. मुंबई ते सोलापूर तसेच मुंबई ते शिर्डीसाठी दोन वंदे भारत गाड्या धावणार आहेत. तसेच पुणे ते हैदराबादसाठी नवीन वंदे भारत गाडी जाहीर होण्याची शक्यता आहे. यासाठी आवश्यक निधीदेखील यंदाच्या बजेटमध्ये समावेश केल्याची माहिती आहे.