गल्लीबोळातले सावकार ‘खाकी’च्या रडारवर; पडद्यामागच्या ‘फायनान्सर’चा जीव खालीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 12:48 PM2020-08-06T12:48:20+5:302020-08-06T12:51:11+5:30
खरे सूत्रधार शोधून काढा : पोलिसांना सोलापूरकरांचे आवाहन; हे तर केवळ हिमनग
सोलापूर : डान्सबारचालक अमोल जगताप आत्महत्या प्रकरणानंतर शहरातील अवैध सावकारी धंद्याचे पितळ उघडे पडत चालले आहे. गल्लीबोळातील काही सावकारांवर धाडी टाकल्या जात आहेत. मात्र, या छोट्या-मोठ्या सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरवणाºया ‘फायनान्सर’ मंडळींचा पर्दाफाश केला पाहिजे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
कधी काळी पत्र्याच्या शेडमध्ये राहणारी काही मंडळी एका झटक्यात लाखो रुपये कर्जाने कसे काय देऊ शकतात, याचाही शोध घेण्याची वेळ आता पोलिसांवर आली आहे. या छोट्या-मोठ्या सावकारांना पडद्यामागून काळा पैसा पुरवणारे फायनान्सर आजही समाजात उजळ माथ्याने प्रतिष्ठितपणाचा आव आणून फिरत आहेत. या लोकांनाही प्रशासनाने रडारवर घेणे गरजेचे आहे.
मंगळवारी उपनिबंधक कार्यालयाने १० सावकारांच्या घरांवर, कार्यालयांवर धाड टाकल्यानंतर बुधवारी तीन सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली. या तीन सावकारांकडील कोरे धनादेश, स्टँप आदी आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली.
दत्तात्रय मादगुंडी (वय ६५, रा. सोलापूर) या ज्येष्ठ नागरिकाने व्याजासाठी सावकाराकडून होत असलेल्या त्रासाबद्दल दहा लोकांची यादी तयार करुन शहर उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार दिली होती. तक्रारीची दखल घेत शहर उपनिबंधक नागनाथ कंजेरी यांनी पोलिसांच्या मदतीने दोन पथके तयार केली होती.
पथकाने विडी घरकूल परिसरातील सात सावकारांच्या घरी धाडी टाकल्या. या भागातील दोन सावकारांच्या घरात धनादेश, कोरे धनादेश, स्टॅम्प आदी आक्षेपार्ह कागदपत्रे आढळून आली. त्या दोन्ही सावकारांच्या विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मोदी स्मशानभूमीजवळील सोनी नगरात एकाच सावकाराच्या घरावर धाड टाकण्यात आली. दमाणी नगर व रामलाल चौकातील दोन सावकारांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. यापैकी एका सावकाराविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
त्रस्त कर्जदार येताहेत पुढे...
जुना पुणे नाका येथील हांडे प्लॉट परिसरातील गुरुकृपा या बिल्डिंंगमध्ये दि. १३ जुलै रोजी हॉटेल गॅलेक्सीचे मालक अमोल जगताप यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून पत्नी व दोन मुलांसह गळफास घेऊन आत्महत्या केली होती. हा गंभीर प्रकार लक्षात घेऊन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शहरातील नागरिकांना सावकारांविरुद्ध तक्रारी देण्याचे आवाहन केले होते. यानुसार दत्तात्रय मादगुंडी या ज्येष्ठ नागरिकाने एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल दहा सावकारांविरुद्ध शहर उपनिबंधक कार्यालयात तक्रार दिली होती. आवाहनाला प्रतिसाद म्हणून लोक हळूहळू सावकारांविरुद्ध तक्रारी देण्यास पुढे येत आहेत.