मान्सूनचा शिडकाव
By admin | Published: June 20, 2014 12:55 AM2014-06-20T00:55:03+5:302014-06-20T00:55:03+5:30
पहिल्या पावसाने सुखद गारव्याची अनुभूती दिली.
रिपरिप येतो मनी तरंगतो आनंदाचे गाणी
रंग येऊनी पानोपानी स्मरवितो तराणे
पाऊस आला, पाऊस आला, पाऊस आला
सोलापूर : गेल्या महिनाभरातील असह्य उकाडा आणि उन्हामुळे त्रस्त झालेल्या सोलापूरकरांना आज मान्सूनच्या पहिल्या पावसाने सुखद गारव्याची अनुभूती दिली. केरळात जूनच्या पहिल्या आठवड्यात सक्रिय झालेल्या मान्सूनचे गेल्या सप्ताहात कोकणात आगमन झाल्यानंतर सोलापुरातही या मोसमी पावसाचा शिडकावा झाला.... काव्यपंक्ती आणि पाऊसधारांच्या ग्राफिक्सचे सोशल नेटवर्क आणि मोबाईल एसएमएसद्वारे देवाण-घेवाण करून साऱ्यांनीच मान्सूनचे स्वागत केले.
शहर आणि परिसरात आज सकाळपासूनच कडक ऊन पडले होते. वातावरणात धग होती. शहराच्या गावठाण भागातील चौपाड, पत्रा तालीम, बाळी वेस, दत्त चौक, सुभाष चौक परिसरात दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कडक ऊन असतानाही पावसाची रिपरिप झाली... मृदगंध दरवळला. हाच पाऊस डफरिन चौक आणि पुढील हद्दवाढ भागात नव्हता.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास आकाशात ढग दाटून आले. मान्सूनचा पाऊस पडणार असा कयास लावून सोलापूरकर पावसाच्या प्रतीक्षेत होते. तासभर पाऊस पडलाच नाही. त्यामुळे वाऱ्यामुळे ढग निघून जातील. पाऊस हुलकावणी देईल, असे वाटत असताना पाच वाजण्याच्या सुमारास जलधारा कोसळू लागल्या. उकाड्यामुळे त्रस्त झालेले शहरवासीय पावसामुळे सुखावून गेले.... मान्सूनचे आगमन झाले; पण हा पाऊस दीर्घकाळ नव्हता. तासाभराच्या शिडकाव्यानंतर आभाळ पुन्हा निरभ्र झाले. सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत २.८ मि. मी. इतक्या पावसाची नोंद झाली.