रमजान महिन्यात पाणीदार फळांना मागणी जास्त
By Appasaheb.patil | Published: May 16, 2019 12:54 PM2019-05-16T12:54:14+5:302019-05-16T12:58:12+5:30
रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली.
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : एकीकडे रखरखते ऊन... अन् दुसरीकडे रमजानचे रोजे. दिवसभर उपासीपोटी दैनंदिन कामे मार्गी लावण्यासाठी मुस्लीम बांधव फळांचा आस्वाद घेऊन रोजे सोडतात. सध्या पवित्र रमजान महिन्यात पाणीदार फळांना विशेष मागणी आहे. मागणीच्या तुलनेत बाजारात कमी प्रमाणात फळे दाखल होत असल्याने फळांच्या भावात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे़ याशिवाय मागणीअभावी डाळिंब, पेरूच्या भावात घट झाल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
रमजान महिना सुरू झाल्यानंतर मुस्लीम बांधवांकडून केळी, आंबा, पपई, कलिंगड आणि खरबुजाची मागणी वाढली आहे़ यंदाही रमजानच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी व्यापाºयांची विविध फळांच्या उपलब्धतेसाठी धावपळ होत आहे़
दुष्काळी स्थितीमुळे उत्पादन आणि आवक घटल्याने बहुतांश फळांचे भाव यंदा तेजीत आहेत. सामान्य ग्राहक रमजानमध्ये स्वस्तातील केळीला जास्त पसंती देत असल्याची माहिती फळविक्रेते रिजवान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ विविध फळबाजारातील व्यापाºयांनी केळी खरेदीवर भर दिला आहे. परप्रांतातून अन् विदेशातून मोठ्या प्रमाणावर फळे आली आहेत.
उत्पादकांमध्ये समाधान...
- यंदा पाणीटंचाई आणि अति तापमान यामुळे उन्हाळ्यात केळीच्या बागा जगविणे मुश्कील होण्याची शक्यता बळावली आहे. यामुळे शेतकºयांनी तेजीचा फायदा उचलून केळीबागा लवकर खाली करण्यावर लक्ष केंद्रित केले़ रमजान महिन्यात केळीला मागणी जास्त आहे़ पौष्टीक व स्वस्त असल्याने रोजा (उपवास) सोडताना सर्रास मुस्लीम बांधव केळीचा वापर करीत असल्याचे दिसून येत आहे़ संपूर्ण रमजान महिन्यात केळीचे भाव तेजीत राहण्याची शक्यता असल्याने उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगण्यात आले़
पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी
- मुस्लीम धर्मीयांचा पवित्र समजला जाणारा रमजान महिना सुरू झाला आहे़ या काळात मुस्लीम बांधवात पहाटेपासून ठेवण्यात आलेले रोजे (उपवास) संध्याकाळी सोडण्याची प्रथा आहे. रोजा सोडताना सर्वसाधारणपणे जड पदार्थ न खाता ज्यात पाण्याचे प्रमाण जास्त आहे ती फळे खाण्याची एक पद्धत प्रचलित आहे. दिवसभर पाण्याचा एक थेंब न पिण्याचाही नियम रोजा काळात पाळला जातो. त्यामुळे संध्याकाळी रोजा सोडताना केळी, कलिंगड, पपई, डाळिंब, अननस, टरबूज या पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांना मागणी मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.
पाणीदार फळांची आवक निम्म्यावर
- पश्चिम व उत्तर महाराष्ट्रातील काही शेतकरी रमजान महिन्यात पाणीदार फळे बाजारात विक्रीसाठी आणण्याचा प्रयत्न करतात़ कारण या काळात त्यांच्या मालाला चांगला भाव देखील मिळतो़ दुष्काळामुळे आवक कमी असल्यामुळे फळांना चांगला भाव मिळतो़ परिणामी शेतकºयांच्या उत्पन्नात वाढ होते़ यंदा या फळांवर पाणीटंचाईचे संकट असले तरी बाजारात फळांची आवक चांगल्या प्रमाणात दिसून येत आहे़ रमजान काळात येणाºया या पाणीदार फळांची आवक निम्म्यावर आली असून, त्यांचे दर वाढत असल्याचे फळ विक्रेत्यांनी सांगितले़
रमजानचा पवित्र महिना सुरू आहे़ रोजा (उपवास) सोडण्यासाठी फळांचा वापर वाढला आहे़ यंदा आवक कमी असली तरी म्हणावे तसे भाव वाढले नाहीत़ शहरातील विविध मशिदीमधील मुस्लीम बांधवांना रोजा सोडण्यासाठी सामाजिक संस्था, संघटनांकडून फळांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहे़ सोलापूर जिल्ह्यातील विविध भागांसह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून फळे विक्रीसाठी सोलापुरात येत आहेत.
- सुलतान शेख
फळविक्रेता, सोलापूर
फळ घाऊक किरकोळ (दर प्रति किलो रुपयात)
सफरचंद ५५ १५० ते २००
पेरू ४६ १००
मोसंबी १६ ५० ते ६०
पपई २० ४५
चिकू ३५ ६५
संत्री २४ ५० ते ६०
केळी (डझन) २० ३० ते ३५
कलिंगड (नग) १५ ३० ते ३५
पपई (नग) १० ते १२ १०