महादेव कोळीसह ३३ अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीच्या मागण्यांसाठी मंत्रालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2020 07:50 PM2020-11-25T19:50:24+5:302020-11-25T19:50:32+5:30
माजी मंत्री दशरथ भांडे यांची माहिती : ९ डिसेंबर रोजी शासनाला देणार अल्टिमेटम
सोलापूर : राज्यातील महादेव कोळीसह ३३ अन्यायग्रस्त अनुसूचित जमातीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात ९ डिसेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती माजी मंत्री डॉ. दशरथ भांडे यांनी सोलापुरात बोलताना दिली.
महाराष्ट्रात विशिष्ट समाजाचे लोकप्रतिनिधी महादेव कोळीसह अन्य जाती-जमातींना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्यास सातत्याने विरोध करीत असतात. शासनावर दबाव टाकून ३३ समाजघटकांना शासकीय सेवेतून वंचित ठेवले जात असल्याची तक्रार करीत जिल्हानिहाय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून सोलापुरात रविवारी कार्यकर्ता मेळावा घेण्यात आल्याचे डॉ. दशरथ भांडे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून अनुसूचित जमातीच्या लाखो कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात येत आहे. हा निर्णय २०१७ साली झाला असला तरी तो पूर्वलक्षी प्रभावाने लागू केला जात आहे. हे चुकीचे असून सर्व कर्मचाऱ्यांना सेवा संरक्षण देण्यात यावे. शालेय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी दाखले सादर करण्याची अट रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जात पडताळणीची अट रद्द करून सर्व लाभ द्यावेत, महादेव कोळी आणि कोळी महादेव एकच असल्याचा शासन निर्णय पारित करावा, सन १९५० पूर्वीच्या जातीच्या दाखल्याचा पुरावा मागणारे परिपत्रक मागे घ्यावे, दाखला देताना क्षेत्रीय बंधनाची अट घालण्यात येऊ नये अशा दहा मागण्यांसाठी राज्य सरकारला मोर्चाद्वारे अल्टिमेटम देणार असल्याचे डॉ. दशरथ भांडे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस प्रा. अशोक निंबर्गी, अंबादास कोळी, सुधाकर सुसलादी, नागेश बिराजदार, सिद्धार्थ कोळी, रवी यलगुलवार, अरुण लोणारी, भारती कोळी, गणेश कोळी, संजीव कोळी, हनुमंत मोतीबने, बाळासाहेब कोळी, विश्वनाथ कोळी उपस्थित होते.