दाखल्याअभावी १६ हजारांहून अधिक लाभार्थी राहणार वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:07+5:302021-02-09T04:25:07+5:30
सांगोला तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण ३५९६, अनुसूचित जाती ४८५, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना सर्वसाधारण ५५२५, अनुसूचित जाती ...
सांगोला तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे सर्वसाधारण ३५९६, अनुसूचित जाती ४८५, श्रावणबाळ राज्य निवृत्ती योजना सर्वसाधारण ५५२५, अनुसूचित जाती १५००, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना ४७२७, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजना २१७, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग योजना २६, राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना १४ अशा १६ हजार ९० लाभार्थ्यांचा समावेश आहे.
या लाभार्थ्यांना त्यांचे मानधन कायम ठेवण्यासाठी डिसेंबरअखेर हयातीचा दाखला संबंधित बँकेकडे सादर करावा लागतो. त्यामुळे दरवर्षी हजारो निराधार लाभार्थी हयातीचा दाखला मिळवण्यासाठी विविध ठिकाणी पायपीट करतात. परंतु आता या दाखल्याचे स्वरूपच बदल्याने हयातीच्या दाखल्यासाठी विविध कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे. वयोवृद्ध लाभार्थी आणि दिव्यांग लाभार्थ्यांना ही कागदपत्रे मिळवणे कठीण होत आहे.
नव्या दाखल्याबाबत अनभिज्ञता
प्रशासनाकडून या संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले नसल्याने हजारो लाभार्थी हयातीच्या नव्या दाखल्याबाबत अनभिज्ञ आहेत. निराधार योजनांच्या लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी असलेल्या अर्जाचे स्वरूप बदलण्यात आले आहे. यासंदर्भात बँकांनी मात्र हयातीच्या दाखल्याशी आमचा कोणताही संबध नसून तहसील कार्यालयाकडून निराधारांच्या खात्यात जमा झालेली रक्कम प्रत्यक्षात लाभार्थीच काढू शकतो, असे सुनावले आहे.