राज्यातील दोनशेपेक्षा अधिक साखर कारखान्यांकडून यंदा होणार गाळप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2020 11:55 AM2020-10-03T11:55:17+5:302020-10-03T11:56:35+5:30
राज्यातील उच्चांकी संख्या; १९८ कारखान्यांचे परवाना अर्ज दाखल
सोलापूर : यंदाच्या गाळप हंगामासाठी राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी परवाने अर्ज दाखल केले असून, या संख्येत आणखी वाढ होऊन दोनशेहून अधिक कारखान्यांकडून यंदा गाळप होईल. आजवरच्या हंगामातील ही संख्या सर्वाधिक आहे. यापूर्वी १९५ कारखाने सुरू झाले होते.
साखर कारखाने सुरू करण्यासाठी साखर आयुक्तांचा रितसर परवाना घ्यावा लागतो. गाळपाच्या परवान्यासाठीचे अर्ज राज्यातील आठ प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे आले आहेत. साखर आयुक्त कार्यालयात या अर्जांची तपासणी केली जाते. यामध्ये मागील हंगामाची एफआरपी चुकती केली आहे का?, शिवाय इतर देणे असल्याच्या तक्रारी आहेत का?, या बाबी पाहूनच गाळप परवाना मिळतो. प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडून ९३ कारखान्यांचे प्रस्ताव साखर आयुक्त कार्यालयाला सादर झाले आहेत. त्यापैकी २२ साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला असल्याचे सांगण्यात आले.
पुढील आठवड्यात यापैकी बहुतेक कारखान्यांना गाळप परवाना दिला जाणार आहे. गाळप परवान्यासाठी अर्ज करण्यासाठी आॅगस्ट व सप्टेंबर अशी दोन महिने मुदत दिली होती; मात्र त्यानंतरही अर्ज केला तर गाळप परवाना दिला जाणार आहे. त्यामुळे आणखीन काही कारखाने गाळपासाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. मागील वर्षी राज्यात उसाचे क्षेत्र फारच कमी होते. त्यामुळे अवघे १४७ कारखाने सुरू झाले होते. यावर्षी ८७४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल असा अंदाज आहे.
सोलापूर, उस्मानाबादसाठी ४० अर्ज
२०१८-१९ मध्ये राज्यातील १९५ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम घेतला होता. हा आकडा उच्चांकी होता. यंदा सुरू होणाºया कारखान्यांची संख्या वाढल्याने अधिक लोकांना रोजगार मिळणार आहे. दरम्यान, सोलापूर प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाकडे सोलापूर जिल्ह्यातील २९ व उस्मानाबादचे ११ अशा ४० साखर कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. लोकमंगल उद्योग समूहाचे तीन, मातोश्री लक्ष्मी शुगर, फॅबटेक, आदिनाथ व इतर असे सहा ते सात कारखाने अर्ज करू शकतात.