कोरोनामुळे मध्यमवर्गीयांचे मृत्यू अधिक; श्रमिकांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2020 11:55 AM2020-05-22T11:55:31+5:302020-05-22T11:58:03+5:30
कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण; खासगी दवाखान्यात उपचार उपलब्ध नसल्याचाही फटका
समीर इनामदार
सोलापूर : सोलापुरात वाढलेल्या मृत्यूंमध्ये मध्यमवर्गीय नागरिकांचे विशेषत: श्रमिक कामगारांचे प्रमाण अधिक आहे. कोविड-१९ मुळे मृत्युमुखी पडलेल्यांचे विश्लेषण केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
मृत्युमुखी पडलेल्यांचा सामाजिक विचार केल्यानंतर यामध्ये रोजंदारीवर जाणाºया नागरिकांचा समावेश आहे. अशा नागरिकांची आर्थिक स्थिती हलाखीची असल्याने ते स्वत:च्या आरोग्याकडे फारसे गांभीर्याने पाहू शकत नाहीत. ‘रोज आणावे तेव्हा खावे’ अशी परिस्थिती असल्याने त्यांना कामावर जावे लागते. त्यामुळे अशा नागरिकांना औषधे आणणेदेखील परवडणारे नसल्याने ही समस्या अधिक गंभीर बनली आहे.
यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये सारीच्या रोगाने मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या साधारणत: ७९ इतकी आहे. गतवर्षी सारीमुळे मरण पावलेल्यांची संख्या ही या दोन महिन्यांत ५९ इतकी होती. खासगी दवाखाने उपलब्ध नसल्याने यंदा मृत्यूचे प्रमाण वाढल्याचे यात म्हटले आहे.
कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेले सुमारे ८९ टक्के नागरिक हे लोकसंख्येची अत्यंत जास्त घनता असलेल्या भागात राहतात. यामुळे कोरोनाचा प्रसार अधिक प्रमाणावर झाला आहे.
त्याचप्रमाणे मृत्युमुखी पडलेल्या ३४ नागरिकांमध्ये जवळपास ८९ टक्क्यांहून अधिक प्रमाण हे ५० वर्षांवरील वयोगटातील आहे. त्याचवेळी ११ टक्के इतके प्रमाण हे ५० टक्क्यांपेक्षा कमी वय असलेल्या नागरिकांचे आहे. ५० कमी वय असलेल्या नागरिकांनाही इतर आजाराने ग्रासल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे मृत्यूचे प्रमाण हे अधिक वय आणि आजारांमुळे झाल्याचे निष्पन्न होते.
यातील ७० टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून दोन दिवसांत आणि ८५ टक्के मृत्यू हे रुग्णालयात दाखल केल्यापासून पाच दिवसांत झालेले आहेत. रुग्णालयात उशिरा दाखल होणे, हे त्यांच्या मृत्यूमागचे आणखी एक कारण असू शकते, असे यात म्हटले आहे.
५० वर्षांवरील वय...
- कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये ७८ टक्क्यांहून अधिक नागरिकांना एक किंवा एकापेक्षा अधिक आजार होते. उर्वरित मृतांचे वय झालेले होते. ५० वर्षांवरील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना एकही आजार नाही, असे झालेले नाही. वयोवृद्ध झालेल्या नागरिकांचा मृत्यू अन्य दुसºयाही कारणास्तव झाला असता, त्यामुळे ते कोरोनामुळेच वारले, असे म्हणता येणार नाही.