अधिकमासात गरिबांचा पांडुरंग झाला कोट्यधीश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:33 PM2018-06-15T12:33:36+5:302018-06-15T12:33:36+5:30
प्रभू पुजारी
पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनाची आस मनी घेऊन राज्याच्या कानाकोपºयातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात़ यंदा १६ मे ते १३ जून या कालावधीत अधिक मास झाला़ शिवाय उन्हाळी सुटी असल्याने पांडुरंगाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती़ यामुळेच या अधिकमासात भाविकांकडून विविध प्रकारच्या देणगीतून श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले़ तसेच श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला भाविकांकडून १५४ ग्रॅस ५०० मिली सोने तर ४ किलो ८०५ ग्रॅम ३०० मिली चांदी प्राप्त झाल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सचिन ढोले यांनी दिली़
पंढरपुरात आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्र या प्रमुख यात्रा असतात़ या यात्रेदरम्यान श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मोठ्या प्रमाणात देणगी प्राप्त होते; मात्र यंदा तीन वर्षांनंतर येणारा अधिकमास आला, तोही उन्हाळी सुटीत़ त्यामुळे विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेण्यासाठी एसटी, रेल्वे, खासगी वाहनांनी लाखोंच्या संख्येने भाविक पंढरपूरच्या दिशेने येत होते़
काखेला किंवा पाठीला अडकविलेली बॅग़़, ऊन लागू नये म्हणून डोक्याला रुमाल बांधलेला़ हातात भगवा झेंडा घेऊऩ़़ मुखी विठुनामाचा जयघोष करीत़़ झपाझप पावले टाकत अनेक महिला, पुरुष भाविक चिमुकल्यांसह मंदिराच्या दिशेने येत असल्याचे दिसून येत होते़ भाविकांच्या गर्दीने स्टेशन रस्ता, शिवाजी चौक, मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट महिनाभर फुलून गेलेला होता़
पंढरपुरात दाखल झालेले भाविक चंद्रभागा नदीत स्नान करून विठ्ठल-रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेण्यासाठी दर्शनरांगेकडे जात होते़ त्यामुळे दर्शनरांग संत ज्ञानेश्वर महाराज दर्शनमंडप भरून पुढे जात होती़ परिणामी महिनाभरात एकूण ६ लाख ९५ हजार भाविकांनी पदस्पर्श दर्शनाचा लाभ घेतला़ शिवाय मुखदर्शन घेण्यासाठीची रांग तुकाराम भवनच्या पाठीमागे जात होती़ त्यामुळे ९ लाख ७५ हजार भाविकांनी मुखदर्शनाचा लाभ घेतला़ साहजिकच आलेला प्रत्येक भाविक आपल्या कुवतीप्रमाणे देणगी देतोच़ त्यामुळे अधिक मासात पांडुरंगाच्या देणगीमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येते़ तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ च्या अधिक मासात २ कोटी ५ लाख ३७ हजार ७५१ रुपयांचे उत्पन्न मिळाले होते़ त्यात यंदाच्या अधिक मासात २७ लाख १४ हजार १०३ रुपयांची वाढ झाली आहे़
देणगीचे स्वरूप
- -- श्री विठ्ठलाच्या पायावर ३४ लाख ७३ हजार ८५१ रुपये
- - श्री रुक्मिणी मातेच्या पायावर ९ लाख ६३ हजार ५०७ रुपये
- - अन्नछत्र देणगी १ लाख ६९ हजार ७४७ रुपये
- - पावती स्वरुपातील देणगी ६६ लाख २३ हजार ८७३ रुपये
- - बुंदी लाडूप्रसाद विक्री ३२ लाख ५ हजार ७४० रुपये
- - राजगिरा लाडूप्रसाद विक्री ३ लाख ७८ हजार ९०० रुपये
- - फोटो विक्री ६२ हजार २०० रुपये
- - भक्तनिवास, वेदांत, व्हिडीओकॉन देणगी १२ लाख २८५ रुपये
- - नित्यपूजा ४ लाख रुपये
- - श्री विठ्ठल विधी उपचार १ लाख ८८ हजार रुपये
- - हुंडी पेटी जमा ४५ लाख ९ हजार १४४ रुपये
- - परिवार देवता दक्षिणा पेटी जमा ८ लाख १० हजार ८३१ रुपये
- - चंदनउटी पूजा २ लाख ४० हजार १९ रुपये
- - अन्य स्वरुपात १० लाख २५ हजार ८१३ रुपये
- - अशा पद्धतीने विविध स्वरुपात अधिक मासामध्ये २ कोटी ३२ लाख ५१ हजार ९२४ रुपयांचे उत्पन्न श्री विठ्ठल-रुक्मिणी समितीला मिळाले आहे़