मोहोळ तालुक्यात लाखाहून अधिक मतदारांनी बजावला हक्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:25 AM2021-01-16T04:25:44+5:302021-01-16T04:25:44+5:30
मोहोळ : मोहोळ तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान झाले. १ लाख ३२ हजार २९५ मतदारांपैकी ...
मोहोळ : मोहोळ तालुक्याच्या राजकारणाची दिशा ठरवणाऱ्या ६३ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी चुरशीने मतदान झाले. १ लाख ३२ हजार २९५ मतदारांपैकी १ लाख ८ हजार ९६९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ७० हजार ४३४ पुरुष मतदारांपैकी ५८ हजार ६७१ पुरुषांनी मतदान केले. ६१ हजार ८६० महिला मतदारांपैकी ५० हजार २९८ महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकूण तालुक्यात ८२.३७ टक्के मतदान झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या ५५९ जागांसाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरलेल्या १२३४ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवारीत मतदान पेटीमध्ये बंद झाले. सुज्ञ मतदारांनी कौल कोणाच्या बाजूने दिला आहे हे मात्र १८ जानेवारीच्या निकालादिवशी समजणार आहे.
तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेस १५ जानेवारी रोजी सकाळी साडेसात वाजता सुरुवात झाली. ग्रामीण भागात सकाळच्या सत्रामध्येच मतदानासाठी मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. दुपारचे तुरळक मतदान वगळता सायंकाळच्या सत्रात पुन्हा रांगा लागलेल्या दिसून आल्या.
सावळेश्वर, खुनेश्वरला पोलीस अधीक्षकांची भेट
दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते यांनी तालुक्यातील शेटफळ आणि सावळेश्वर येथे भेट देऊन मतदान केंद्राची पाहणी केली. येथे बंदोबस्ताचा आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी पेनूर मतदान केंद्राला भेट दिली. यासह निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक अधिकारी राजशेखर लिंबारे, पोलीस निरीक्षक अशोक सायकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांनी तालुक्यातील संवेदनशील गावांना भेटी दिली. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण पात्रुडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने बहुतांश ठिकाणी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध ठेवल्या होत्या.
सय्यद वरवडेत बंद पडले मशीन
या निवडणूक प्रक्रियेत २४६ बूथवरती केवळ सय्यद वरवडे येथे एक मशीन काही काळापुरते बंद पडले होते. तो अपवाद वगळता तालुक्यात सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडलेे.
फोटो - १५ मोहोळ १
पेनूर मतदान केंद्रावर मतदारांनी केलेली गर्दी.
फोटो - १५ मोहोळ २
टाकळी येथे आरोग्य विभागाने मतदारांची काळजी घेतली.