सोलापूर जिल्हा परिषदेच्या एक हजाराहून अधिक संस्था आयएसओ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 01:11 PM2018-05-23T13:11:56+5:302018-05-23T13:11:56+5:30
सोलापूर : गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ५९ ग्रामपंचायती, तीन पंचायत समित्यांसह जिल्हा परिषदेशी संलग्नित १०७२ हून संस्थांना आयएसओचे मानांकन मिळाले आहे. यातून झेडपीच्या नावलौकिकात भर पडल्याचा दावा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि सीईओ डॉ. राजेंद्र भारुड यांनी केला आहे.
शासकीय कार्यालयाबद्दलचा लोकांचा दृष्टिकोन बदलायला हवा. कार्यालयातील वातावरण चांगले असायला हवे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्याकडून केले जाते. गुणवत्तेसाठी आजही ‘आयएसओ’ मानांकन महत्त्वाचे मानले जाते. झेडपीशी संलग्नित संस्थांना हे मानांकन मिळायला हवे, यासाठी गेले वर्षभर त्यांनी ग्रामपंचायत, महिला व बालकल्याण, शिक्षण, आरोग्य, पशुसंवर्धन या विभागाच्या प्रमुखांची नियमितपणे आढावा बैठक घेतली. त्यातही ग्रामपंचायती, शाळा आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांवर विशेष जोर दिला. चांगल्या शाळा आणि चांगले दवाखाने असतील तर गावातील वातावरणही चांगले राहते, हा त्यामागचा दृष्टिकोन आहे.
सेसमधून दिला निधी
- सेवांच्या गुणवत्तेसाठी ‘आयएसओ’चे मानांकन महत्त्वाचे मानले जाते. हे मानांकन मिळविण्यासाठी लोकसहभागही महत्त्वाचा ठरतो. ‘आयएसओ’चे मानांकन मिळविण्यासाठी नोंदणी शुल्क भरावे लागते. संबंधित केंद्राची चार टप्प्यात तपासणी केली जाते. कार्यालयातील सुसज्ज व्यवस्था, शौचालय, पाणीपुरवठा अशा विविध मूलभूत सुविधा आदींसाठी विशेष गुण असतात. कार्यालयाच्या माध्यमातून पुरविण्यात येणाºया सेवांचे फलक, व्यक्ती या विषयी माहिती केंद्रांमध्ये लावणे आवश्यक असते. ग्रामपंचायत, शाळा, आरोग्य केंद्रांसाठी तर विशेष निकष आहेत. ‘आयएसओ’साठी काम सुरू झाल्यानंतर कार्यालयाशी संबंधित लोकांचा दृष्टिकोनही त्यातून दिसून येतो. मूलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून आणि लोकसहभागातूनही निधी देण्यात आला.
तीन पंचायत समित्यांसह विविध केंद्रांचा समावेश
- पशुसंवर्धनच्या १४३ केंद्रांना आयएसओचे मानांकन मिळाले आहे. यात ७८ श्रेणी १ चे दवाखाने, ६३ श्रेणी दोनचे दवाखाने, १ पंचायत समितीतील केंद्र, १ कुक्कुटपालन केंद्राचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात ५९ ग्रामपंचायतींनीही हे मानांकन मिळविले. महिला व बालकल्याण विभागांतर्गत ४०९ अंगणवाड्यांना आयएसओचे मानांकन मिळाले. यातही अकलूज केंद्रातील सर्वाधिक १३४ अंगणवाड्यांचा समावेश आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आणि एक ग्रामीण रुग्णालय अशा ५२ केंद्रांनीही मानांकन पटकाविले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील ४०९ शाळांनाही मानांकन मिळाले आहे. अक्कलकोट, माळशिरस आणि पंढरपूर या पंचायत समित्यांचा यात समावेश आहे.
आयएसओसाठी प्रशासनाने वेळोवेळी खातेप्रमुखांकडे पाठपुरावा केला. यातून केवळ प्रमाणपत्र मिळविणे हा उद्देश नाही. आपल्या कार्यालयातील वातावरण कसे असावे याची जाणीव कर्मचाºयांमध्ये निर्माण व्हावी हा यामागचा प्रयत्न आहे. शाळा आणि आरोग्य केंद्रामध्ये चांगले वातावरण असावे यासाठी तर प्रयत्न करतोय. परंतु, आयएसओ मिळाल्यामुळे कर्मचाºयांना कामातही हुरुप येणार आहे.
- डॉ. राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.