माघी यात्रेसाठी पंढरपुरात तीन लाखांपेक्षा अधिक भाविक दाखल
By Appasaheb.patil | Published: January 31, 2023 11:39 AM2023-01-31T11:39:59+5:302023-01-31T11:40:44+5:30
माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे.
सोलापूर :
माघी यात्रेचा सोहळा पंढरपुरात साजरा हाेत आहे. यात्रेनिमित्त विठ्ठल-रूक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची गर्दी वाढली आहे. तीन लाखांपेक्षा अधिक भाविक पंढरीत दाखल झाले असून उद्या होणाऱया सोहळ्यासाठी पाच लाखांहून अधिक भाविक येण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते माघी एकादशीची महापूजा होणार आहे. यावेळी सोलापूरसह अन्य भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. माघी यात्रेच्या उत्सवात मंदिर समितीकडून भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी दर्शनरांगेत पत्राशेड येथे कायमस्वरूपी ४ व तात्पुरते २ असे ६ वॉटरप्रूफ दर्शन शेड उभारण्यात आले आहेत. दरम्यान, बुधवारी माघी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा असला, तरी मंगळवारीच पाचव्या दर्शन मंडपामध्ये रांग पोहचली होती. अवघ्या महाराष्ट्राची आध्यात्मिक राजधानी असलेल्या श्रीक्षेत्र पंढरपूर येथे १ फेब्रुवारी रोजी माघी यात्रा भरत आहे. या यात्रेत येणाऱया लाखो भाविक वारकऱयांना सेवासुविधा पुरविण्यासाठी मंदिर समितीसह पंढरपूर नगरपरिषदेची यंत्रणा सज्ज झाली आहे.
दरम्यान, यात्रेनिमित्त सोलापूर ग्रामीण पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. वारकऱयांच्या सुरक्षेसाठी पोलिस रात्रंदिवस बंदोबस्त करीत आहेत. मंदिर समितीने यात्रेच्या अनुषंगाने संपूर्ण तयारी केली आहे. पंढरपुरात शहरात स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून शहर, चंद्रभागा वाळवंट, ६५ एकर परिसर व मोठय़ा मठांमध्ये स्वतंत्ररीत्या कचरा साठविण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक मठाधिपतींना घंटागाडी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
गोपाळपूर रोड, दर्शन बारी पत्रा शेडमध्ये पिण्याचे पाणी नळ कनेक्शनद्वारे उपलब्ध करून दिले आहे. यात्रा व्यवस्थित पार पडावी म्हणून पंढरपूर नगरपरिषदेचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली, मुख्याधिकारी अरविंद माळी, उपमुख्याधिकारी सुनील वाळुजकर, नगरअभियंता नेताजी पवार, आरोग्य अधिकारी शरद वाघमारे, आरोग्य निरीक्षक नागनाथ तोडकर, पाणीपुरवठा अभियंता आत्माराम जाधव, विद्युत अभियंता राजकुमार सपाटे, रोडलाईट इन्स्पेक्टर संतोष क्षीरसागर, अग्निशमन अधिकारी बाळासाहेब कांबळे सर्व विभागप्रमुख प्रयत्नशील आहेत.