एकाच दिवसात एक हजाराहून अधिक लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:21 AM2021-09-13T04:21:58+5:302021-09-13T04:21:58+5:30
करकंब ग्रामीण रुग्णालयातही मार्चच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण सुरू झाले. लसीच्या पहिल्या टप्प्यापासून ११ सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात डॉ. ...
करकंब ग्रामीण रुग्णालयातही मार्चच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण सुरू झाले. लसीच्या पहिल्या टप्प्यापासून ११ सप्टेंबरपर्यंत सोलापूर जिल्ह्यात ग्रामीण भागात डॉ. तुषार सरवदे व संपूर्ण टीमने अथक व अविश्रांत परिश्रम घेऊन आघाडी घेतली. मार्चमध्ये ३८८, एप्रिलमध्ये १११९, मेमध्ये ६१८, जूनमध्ये ४६९, जुलैमध्ये ७६३, ऑगस्टमध्ये २११५, सप्टेंबरमध्ये २०१६ असे एकूण १८ वर्षे वयापुढील एकूण लाभार्थीच्या ५५ टक्केहुन अधिक लाभार्थ्यांना लस दिली आहे.
११ सप्टेंबर रोजी सोलापूर जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दोन लाख लसींचे उद्दिष्ट ठेवून केलेल्या आवाहनाला यशाची जोड देण्यासाठी माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप ढाले, तालुका वैद्यकीय अधिकारी एकनाथ बोधले यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार सरवदे यांनी ११०६ नागरिकांना लसीकरण केले. त्यासाठी १८०० डोस उपलब्ध झाले होते. यासाठी डॉ. किरण वाहील, अधिपरिचरिका गीतांजली भातकापडे, अनिता कांबळे, प्रीती नवगिरे, म्हस्के, टिंगरे, काळे, अश्विनी साठे, बेनजीर तांबोळी, सूर्यकांत कुरणावळ, रोहित ढगे, साखरे ब्रदर यांचे सहकार्य लाभले, तर करकंब पोलीस स्टेशनचे सपोनि निलेश तारू यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
कोट :::::::::::::
लसीकरणासाठी सार्वजनिक मंडळ, ग्रामपंचायत सदस्य, सर्व नागरिकांनी लसीकरण करून प्रशासनास सहकार्य करून सामाजिक कार्यात हातभार लावावा, असे आवाहन केले होते. त्यानुसार ११ सप्टेंबर रोजी ११०६ नागरिकांचे लसीकरण करू शकलो.
- डॉ. तुषार सरवदे
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय करकंब