सकाळी संततधार.. संध्याकाळी मुसळधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 11:57 PM2017-09-19T23:57:56+5:302017-09-19T23:57:56+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा शहर व परिसरात मंगळवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. ठिकठिकाणी नाले व गटारे तुंबल्याने रस्त्यावर पाणी आले होते. सकाळी संततधार, दुपारी मुसळधार अन् संध्याकाळी धुवांधार अशी पावसाची तीन रूपे सातारकरांनी मंगळवारी अनुभवली.
शहर व परिसरात मंगळवारी रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली. जोरदार सरी कोसळू लागल्यानंतर शहरात दोन दिवसांपूर्वी ठिकठिकाणी उद्भवलेली परिस्थिती पुन्हा निर्माण होईल का? अशी चिंता नागरिकांना लागली होती. मात्र, दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने नागरिकांची चिंता मिटली.
पावसाने अधूनमधून विश्रांती घेतल्याने कोठेही पाणी साचले नाही. सदर बझार परिसरात नाले व गटारे तुंबल्याने पाणी रस्त्यावरून वाहत होते. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाºया पादचाºयांना पाण्यातून वाट काढावी लागली. नवारात्रोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. यापार्श्वभूमीवर मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून मंडप उभारणीचे काम सुरू आहे. मंगळवारी भर पावसातही कार्यकर्त्यांचे मंडप उभारणीचे काम सुरूच होते. खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची पावसामुळे धांदल उडाली.
गोडोलीकरांनी घेतला मोकळा श्वास...
सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका गोडोली व परिसराला बसला. सखल भागात पाणी साचूून राहिल्याने येथील नागरिक व व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले होते. साचलेले पाणी नागरिकांना हाताने बाहेर काढावे लागले होते. या घटनेनंतर प्रशासनाच्या वतीने गोडोली तळ्याशेजारील ओढ्यावरील चेंबर फोडून ओढ्याचे पाणी तळ्यात सोडल्यात आले. त्यामुळे ओढा तुंबण्याचा प्रकार थांबला. मंगळवारी झालेल्या पावसाचा काहीच परिणाम गोडोलीकरांना जाणवला नाही. परिसरात कुठेही पाणी साचले नसल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली.