उपचार अन् अंत्यसंस्कारासाठी सर्वाधिक साेलापूर जिल्ह्यातील नागरिक जातात पुण्याला
By appasaheb.patil | Published: May 15, 2021 03:04 PM2021-05-15T15:04:38+5:302021-05-15T15:05:44+5:30
ई-पाससाठी १८ हजार अर्ज; सहा हजार नागरिकांना दिले जिल्हा सोडण्यासाठी पास
आप्पासाहेब पाटील
सोलापूर : सोलापूर जिल्हा सोडून इतर जिल्ह्यांत किंवा राज्यात जाण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलिसांकडून मिळणारा ई- पास आवश्यक आहे. मागील २३ दिवसांत जिल्ह्यातील १८ हजार नागरिकांनी ई- पाससाठी ऑनलाइन अर्ज केला असून, त्यापैकी ६ हजार ५ अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. उपचार, अंत्यसंस्कार अन् औषधांसाठी ग्रामीण भागातील लोकांचा ओढा पुण्याकडे असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय मुंबई, लातूर, हैदराबाद, विजापूर आदी ठिकाणीही लोक अत्यावश्यक कारणासाठी जात आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या व मृत्यूदर कमी करण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने राज्य अन् जिल्हाबंदीचा निर्णय घेतला आहे. केवळ अत्यावश्यक सेवा आणि योग्य कारण असल्यास घराबाहेर पडण्याची परवानगी आहे. अत्यावश्यक कारणासाठीच आंतरजिल्हा प्रवासाची परवानगी नागरिकांना असेल आणि त्यासाठी ई- पास घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते. जिल्हा व राज्यबंदीच्या आदेशामुळे जिल्ह्याच्या व राज्याच्या सीमेवर २८ ठिकाणी सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नाकाबंदी चालू केली आहे, तसेच आंतरराज्य व जिल्ह्याच्या हद्दीवरील १७३ रस्ते बंद केले होते. ई- पास असल्याशिवाय नागरिक अथवा वाहनांना जिल्ह्याच्या बाहेर प्रवेश देण्यात येत नसल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
१० जणांची टीम २४ तास कार्यरत
अत्यावश्यक सेवेतील नागरिकांना अर्ज केल्यावर तात्काळ कागदपत्रांची तपासणी करून योग्य कारण असल्यास ई- पास मंजूर करून देण्यासाठी सायबर क्राइम विभागाकडील १० जणांची टीम २४ तास कार्यरत ठेवण्यात आली आहे. अंत्यसंस्कार, उपचारासाठी आलेल्या अर्जावर तात्काळ निर्णय घेतला जातो. शिवाय सोशल मीडियावरही लोकांना ई- पासबाबत जनजागृती, प्रचार, प्रसिद्धीही करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांची माणुसकी
ई- पाससाठी ऑनलाइन अर्जात आई किंवा वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जात असल्याचा उल्लेख असल्यास संबंधित टीम कागदपत्रांची तातडीने पडताळणी करते. शिवाय काही कमी- जास्त असल्यास माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्याकडे दुर्लक्ष करून त्वरित ई- पास देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
...या कारणांसाठी केला जातोय अर्ज
कडक संचारबंदीच्या निर्णयातही लोक अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडत आहेत. ई- पाससाठी केलेल्या अर्जात अंत्यसंस्कार, उपचार, औषधे आणण्यासाठी जास्त लोकांनी ई- पाससाठी अर्ज केला आहे. याशिवाय लग्न समारंभ, साखरपुडा, नातेवाइकांना आणायला जाणे, नातेवाइकांना सोडण्यासाठी जाणे, शिक्षण आदी कारणांसाठी जिल्ह्यातील नागरिकांनी ई- पास काढला आहे.
कोरोना चाचणीचे प्रमाणपत्र, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता व योग्य कारण असल्यास ग्रामीण पोलिसांकडून ई- पास देण्यात येत आहे. अंत्यसंस्कार व उपचारासाठी सर्वाधिक लोक अर्ज करीत आहेत. काही लोकांचे अर्ज मंजूर केले आहेत, काहींचे नाकारले. का नाकारले याबाबतची माहितीही संबंधितांना देण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक असेल, तरच घराबाहेर पडावे. स्वत:सोबतच कुटुंबीयांची काळजी घ्यावी. आपल्याला कोरोनाला हरवायचं आहे.
-राजे निंबाळकर,
पोलीस निरीक्षक, सायबर क्राइम, सोलापूर