आई वडील दारुडे म्हणून त्यांच्या बाळाला पळवून आणले...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 13:26 IST2020-08-13T12:59:26+5:302020-08-13T13:26:23+5:30
अकलूजचे पोलीस गोव्यात दाखल; अपहरणकर्त्याच्या जबाबामुळे सारेच अचंबित...!

आई वडील दारुडे म्हणून त्यांच्या बाळाला पळवून आणले...!
सोलापूर : गोव्याच्या मडगाव भागात राहणारे दाम्पत्य सतत नशेत असायचे त्यामुळे या बाळाची हेळसांड होऊ नये म्हणून मी त्याला घेऊन माझ्या गावी निघालो होतो, अशी माहिती अपहरणकर्त्याने अकलूज पोलिसांना दिली आहे.
या बाळाच्या माता-पित्याचा शोध घेण्यासाठी अकलूजचे पोलीस मडगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र कोणत्याच पोलीस ठाण्यात बाळ हरवल्याची नोंद नसल्यामुळे तपासात अडचणी येत आहेत.
याबाबतची माहिती अशी की, गोव्यातून बाळ चोरून आणलेल्या व्यक्तीस अकलूजच्या पोलिसांनी अटक केली होती, त्यानंतर न्यायालयात उभे केले असता वैयक्तीक बाँडवर जामीन देण्यात आले़ परंतु अकलूज पोलिसांनी चौकशीसाठी गोवा पोलिसांच्या ताब्यात दिले, शिवाय ते बाळ पंढरपूरच्या अनाथाश्रमात दाखल केले आहे.
९ रोजी पोलीस कॉन्स्टेबल संदेश रोकडे यांना चेतन ईश्वर सोलंके (रा. विजयनगर कॉलनी, अकलूज) यांचा फोन आला़ बाजार समितीच्या पत्राशेडमध्ये एक संशयास्पद व्यक्ती लहान बाळासह थांबली आहे. तेव्हा त्या ठिकाणी सहा़ पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस हेडकॉन्स्टेबल घाटगे, मोरे असे पोहोचले़ तेथे हणमंत बाबुराव डोंबाळे (वय ६५, रा. शेळगाव, ता. इंदापूर) ही व्यक्ती बसलेली होती़ त्याच्याकडे लहान बाळ होते़ त्याची चौकशी केली असता माझे व पत्नीचे भांडण झाले आहे. म्हणून मी बाळाला घेऊन बाहेर पडलो आहे, असे सांगितले. त्याच्या सासूरवाडीची चौकशी केली असता त्याने बारगाव मळा, एकशीव येथील त्याच्या मेव्हण्याचे नाव सांगितले.
या गावातील पोलीस पाटील, सरपंच व त्याच्या मेव्हण्याकडे चौकशी केली असता ती व्यक्ती गेल्या १६ वर्षांपासून घरी आलेली नाही. ती त्याच्या पत्नीला सांभाळत नाही व त्याचा मुलगा १८ वर्षांचा असून, मुलीचे लग्न झाल्याचे समजले. तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल राजू नायकवडी हे करत आहेत.
१५० किमी चालत आल्याचे सांगताच पोलिसांनी दिले जेवण
६ आॅगस्ट रोजी गवसे येथे तपासणी नाक्याजवळ बाळाला घेऊन डोंबाळे बसला होता. तेथील पोलीस व शिक्षक कर्मचाºयांना त्याने पत्नी आपल्याला व बाळाला सोडून गेल्याचे सांगून गोव्याहून १५० किलोमीटर चालत आल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस व शिक्षकांनी आपुलकी दाखवून जेवण व आर्थिक मदत करून त्याला इचलकरंजीकडे खासगी वाहनातून पाठवून दिले.