आई स्वर्गवासी अन् पोरगं हनिमूनवासी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2019 01:01 PM2019-04-01T13:01:41+5:302019-04-01T13:07:50+5:30
मुलगी परीक्षेच्या शेवटच्या पेपरला गेली. ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. परीक्षा दिल्यानंतर ती गावातीलच एका ...
मुलगी परीक्षेच्या शेवटच्या पेपरला गेली. ती परत आली नाही म्हणून घरच्यांनी शोधाशोध सुरु केली. परीक्षा दिल्यानंतर ती गावातीलच एका मुलाच्या मोटरसायकलवर बसून गेली, असे तिच्या मैत्रिणीने तिच्या वडिलांना सांगितले. तिचे वडील त्या मुलाच्या घरी गेले. तुमच्या मुलाने माझ्या मुलीला कोठे पळवून नेले, त्याबद्दल खडसावत जाब विचारला. मुलाची आई म्हणाली, मला विचारुन पोरगं पळून गेले का? बाचाबाची झाली. त्या बाचाबाचीत रागाने लालबुंद झालेल्या मुलीच्या वडिलांनी तिथेच पडलेला लाकडी दांडगा मुलाच्या आईच्या डोक्यात घातला.
घाव वर्मी बसल्याने ती जागीच मरण पावली. पोलिसांनी मुलीच्या वडिलांना अटक केली. तो मुलगा आणि मुलगी जे पसार झाले ते तीन महिन्यानंतरच परत आले. आपल्या आईचा मृत्यू झाला आहे हे त्या मुलाला माहीत होते. तरीदेखील तो आईच्या अंत्यसंस्काराला किंवा कोणत्याही विधीला हजर झाला नाही. त्या कार्टीला देखील माहिती होते की, आपले वडील कारागृहातील कोठडीत आहेत. तरीदेखील ती आली नाही. कारण माहिती आहे ? त्या मुलीला १८ वर्षे पूर्ण होण्यास तीन महिने बाकी होते. जर आपण परत आलो तर आपल्या प्रेयसीला पोलीस ताब्यात घेतील म्हणून तो दिवटा स्वत:ची आई वारली तरीदेखील आला नाही. ज्या आईने त्याला दिवसरात्र कष्ट करून वाढविले ती वारल्यानंतर तिच्या अंत्यदर्शनासदेखील आला नाही आणि ती कार्टीदेखील आली नाही. कारण तिला तिच्या प्रियकराला पोलीस अटक करतील ही भीती होती. वाचक हो, दुनियादारी बघा. त्या पोराला आईपेक्षा प्रेयसी जवळची झाली होती आणि त्या पोरीला वडिलापेक्षा प्रियकर जवळचा झाला होता. काय अजब दुनिया आहे बघा!
आणि चारच दिवसांपूर्वी जळगाव येथे घडलेल्या घटनेची वर्तमानपत्रात आलेली दुसरी बातमी बघा. ‘मुलगी पळून गेल्यामुळे तणावात असलेल्या पित्याची आत्महत्या’. साखरपुडा झालेला असताना मुलगी प्रियकराबरोबर पळून गेल्याने मुलीच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे रुग्णालयात हलवले तर इकडे घरी मुलीच्या वडिलांनी सिलींग फॅनला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. अशा आशयाची ती बातमी होती. मुलीने उद्योग केला आणि आई-बाप स्वर्गवासी झाले.
वाचक हो लक्षात ठेवा, एकनाथ महाराजांनी म्हटले आहे ‘‘ऐसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी पक्षी अंगणासी आलें आपला चारा चरुनी गेले’’ असे जीवनात वागले पाहिजे. दोन्ही प्रकरणातील आई-वडिलांनी आपण मुलीला शिक्षण दिले, मोठे केले, आपण आपले कर्तव्य केले. मुलगी तिच्या मनाने गेली. तिचे नशीब तिच्याबरोबर ही जर भावना ठेवली असती तर तो बाप जेलमध्ये बसला नसता किंवा त्या मुलाची आईदेखील स्वर्गात गेली नसती. तसे केले असते तर दोन्ही प्रकरणातील चारही जीव वाचले असते. वाचक हो, लक्षात ठेवा. आपल्या पोटी आलेली जी मुलेबाळे असतात ती आपल्याला सुख द्यायला येतात किंवा दु:ख देण्यासाठी येतात. प्रारब्धाचा योगच असा की, ते त्या करिताच येतात. आपण ते जर लक्षात ठेवून वागलो नाही तर मग हा मुलगा असा का आणि तो मुलगा तसा का, याला उत्तर मिळत नाही. तो कशाकरिता आला हे तर ठरलेले आहे.
आपल्यापोटी जन्मलेली मुले चार प्रकारची असतात. घेणेकरी पुत्र. मागच्या जन्मीचा घेणेकरी पुत्र म्हणून जन्मास येतो. त्याला शिकवा, नोकरीला लावा, लग्न करुन द्या. त्याचे देणे घेणे पूर्ण झाले की तो आई-बापाला सोडून जातो. दुसरा वैरी पुत्र! मागच्या जन्मीचा वैरी या जन्मी मुलगा/मुलगी म्हणून जन्माला येतात. अशी मुले पावलोपावली आई-वडिलांना त्रास देत असतात. तिसरा उदासीन पुत्र. असा पुत्र आई-वडिलांना सुखदेखील देत नाही आणि दु:ख देखील देत नाही. चौथ्या प्रकारचा पुत्र ‘सेवक पुत्र’ असतो. मागच्या जन्मी तुम्ही ज्यांची सेवा केली होती, तो या जन्मी तुमचा मुलगा म्हणून येतो आणि आई-वडिलांना भरपूर सुख देतो. म्हणून लक्षात ठेवा ..
रामदास स्वामी म्हणतात ‘’कर्मयोगे सकळ मिळाली एके ठायी जन्मासी आली ती त्वा आपुलि मानिली कैसी रे पढतमूर्खा’’
पोरगा प्रेयसीला घेऊन पळून गेला. त्यामुळे आई स्वर्गवासी झाली. स्वर्गवासी आईला भेटायच्याऐवजी पोरगं झालं ‘हनिमूनवासी’ !
- अॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ज्ञ आहेत.)