आई.. बाप्पा आले गं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 04:59 PM2019-09-09T16:59:53+5:302019-09-09T17:02:35+5:30
बाप्पा हा आता एखाद्या विशिष्ट समाजाचा वा समूहाचा राहिला नाही उलट तो सर्वधर्मसमभावाचा प्रतीक बनला आहे.
‘आई... बाप्पा आले गं!’ मोबाईलवरील रिंग टोनच्या आवाजामुळे मला जाग आली. काही वेळातच गणेशाचे आगमन होणार असल्याने वातावरण प्रफुल्लित झालेले. बाप्पाच्या स्वागताला महिन्यापासून दडी मारलेल्या पावसानेही हजेरी लावल्याने पोशिंदाही सुखावलेल्या अवस्थेत दिसला. बाप्पा तसा आबालवृद्धांचा एकदम आवडता देव. बाप्पाच्या स्वागताची घरी तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठी जय्यत तयारी झालेली. तसं तर बाप्पा हा आता एखाद्या विशिष्ट समाजाचा वा समूहाचा राहिला नाही उलट तो सर्वधर्मसमभावाचा प्रतीक बनला आहे. ही एक आनंदाची बाब म्हणावी लागेल. प्रत्येकाच्या घरासमोर सडा रांगोळीमुळे, प्रवेशदारावरील नैसर्गिक व कृत्रिम तोरणामुळे बोलकेपणा व आकर्षकपणामुळे घरे आनंदाने सजलेली, डौलदारपणे बाप्पाच्या स्वागतासाठी दत्त झालेली पाहून मनात गलबलून आले. बाप्पा म्हणजे आनंद, बाप्पा म्हणजे सुख-समाधान, बाप्पा म्हणजे माणसांना जोडणारा दुवा, बाप्पा म्हणजे उत्साह, बाप्पा म्हणजे सर्जनशीलता व सृजनशीलतेतला आनंद, बाप्पा म्हणजे एकोपा, बाप्पा म्हणजे समानता, बाप्पा म्हणजे कलाविष्कार, बाप्पा म्हणजेच आलबेल.
‘अॅमेझान जंगल तीन आठवड्यांहून अधिक काळापासून जळत आहे. त्या वणव्यापुढे सारेच हतबल? काही वेळानी मित्राच्या व्हॉट्सअॅपवरील ही पोस्ट वाचली आणि मनात विचारांचे काहूर माजले. ‘सुख-सोयीच्या शोधार्थ आपण काय काय हरवत चाललोय..? ‘जेवढा मार्मिक तेवढाच भयावह वाटणारा, न सुटलेल्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी चाललेली धडपड पाहून मन व्यथित होऊन जाते. आपला लाडका बाप्पा दरवर्षी येणार आनंद, उत्साह, समाधान देणार आणि जाणार.. पुन्हा पुढील वर्षी येणार.. जाणार.. ही निरंतर चालणारी परंपरा आहे. परंतु त्या परंपरेच्या नावाखाली अवडंबर माजवलेल्या अनैसर्गिक बाबींचा स्तोम कधी थंडावणार? देव जाणो. मूर्तीसाठी वापरण्यात येणाºया ‘प्लॅस्टर आॅफ पॅरिस’ या गोंडस नावाची माती, सौंदर्य निर्माण करण्यासाठी वापरण्यात येणाºया रासायनिक पदार्थांचा ऊहापोह, डीजेरूपी कर्णकर्कश आवाज, फटाक्यांच्या आतषबाजीने हवेत पसरणारा नाहक धूर व आवाज, रासायनिक रंगांची उधळण, बाप्पाला सजवण्यासाठी वापरण्यात येणाºया प्लास्टिकची यात्रा पाहून...आपण नक्की हे काय करतोय? आपण कोणत्या दिशेने वाहत चाललोय? या प्रश्नांसाठी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे.
साहजिकच वरील सर्व गोष्टींमुळे निर्माण झालेल्या जल, वायू, ध्वनी प्रदूषणांचे, पर्यावरणावर होत असलेल्या परिणामांचे पडसाद आपल्यासमोरच आहेत. एकीकडे जलप्रपात तर दुसरीकडे पाण्यासाठी तरसलेल्या जीवांची होणारी त्रेधातिरपीट. अॅमेझान जंगल जळण्याचा आणि या गोष्टींचा इथे कुठे संबंध येतो? आपल्यातील व अॅमेझानमधील अंतर हजारो कि.मी.चा आहे. असे असले तरी ‘अॅमेझान जंगल म्हणजे पृथ्वीवरील फुफ्फुस आहे.’ हे तर सर्वश्रुतच आहे. पृथ्वीवरील एकूण आॅक्सिजनपैकी २०% आॅक्सिजन एकट्या अॅमेझान जंगलामुळे निर्माण होते, हे तरी आपण ऐकूनच आहोत. कितीतरी पिढ्या बदलल्या तरी अॅमेझानसारखे जंगल आपण निर्माण करू शकत नाही. परंतु पर्यावरणाच्या संतुलनासाठी माणसी एक झाड लावून, संवर्धन करून हातभार तरी लावू शकतो ना! प्लॅस्टर आॅफ परिसपासून बनलेल्या मूर्तीचे पाण्यात विसर्जन न करता नाहक रसायनांपासून होणाºया पाण्याचे प्रदूषण काहीअंशी तरी थांबवू शकतो ना! मर्यादित डेसिबलपर्यंतच आवाज निर्माण करणाºया वाद्यांचा वापर करून ध्वनी प्रदूषण काही स्तरापर्यंत तरी थांबवता येईल ना !
आमच्या बालपणी मातीचेच गजानन घरी यायचे. दहा-बारा दिवस घरात राहून सगळ्यांना आनंदी आनंद करून सोडायचे. मंडळाचेच तेवढे गणपती आपल्या मातीचे नसायचे. परंतु मंडळासमोरील संगीत नाटके, लोकगीते, भजन, कीर्तन, आख्याने मनाला समाधान देऊन जायचे. विसर्जनाच्या वेळेसही मंडळाचे गजानन पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचत नाचत रामराम करायचे. आजची परिस्थिती याहून खूपच वेगळी आहे. सगळीकडेच तशी परिस्थिती नाही, परंतु जिथे आहे तिथे बदलाव आवश्यक आहे. घरोघरी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तरी आपण स्थापन करू शकतो ना! विसर्जित मूर्तीची माती एकातरी वृक्षारोपणासाठी वापरता येईल. आम्ही तरी याचा श्रीगणेशा केला आहे, तुम्हीही करा हीच विनंती मग बाप्पा सगळ्यांनाच सुबुद्धी, शांती, आरोग्य, समाधान नक्की देईलच.
- आनंद घोडके
(लेखक जि. प. शाळेत शिक्षक आहेत.)