आईनं परवानगी दिली.. मनोधैर्य वाढलं अन् नरभक्षक बिबट्याची केली शिकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:19 AM2020-12-23T04:19:20+5:302020-12-23T04:19:20+5:30
बिबट्याचा वध केल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील करमाळ्यात आले होते. त्यांचा तालुक्यात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला, यावेळी ते ...
बिबट्याचा वध केल्यानंतर डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील करमाळ्यात आले होते. त्यांचा तालुक्यात ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला, यावेळी ते मनमोकळेपणाने बोलले.
धवलसिंह म्हणाले की, चार ते पाच दिवस या नरभक्षक बिबट्याच्या मागावर होतो. घटनेच्या दिवशी पहाटे तीन वाजताच वांगी नंबर ४ येथे आलो होतो. पहाटे तीन वाजल्यापासून त्या भागातील जवळपास ७० ते ८० एकर केळीचे क्षेत्र पिंजून काढले. ज्या ज्या ठिकाणी मला बिबट्याच्या पाऊलखुणा नजरेस आल्या त्या त्या ठिकाणी त्याचा माग काढला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अंधार पडू लागला, त्यावेळी जीपच्या टपावर बसून केळीच्या बागेत आत जाण्याचा निर्णय घेतला. उपस्थित वनअधिकाऱ्यांनी रिस्क घेऊ नका, असे सांगितले होते. तरीसुद्धा आत गेलो. अचानक पंधरा फूट अंतरावर शेपटी हलताना दिसली. यावेळी माझ्या सहकाऱ्यांनी तो बिबट्याच असल्याचे खूण करून सांगितले. या हालचालींदरम्यान बिबट्या सावध झाला व त्याने जंप मारण्याची पोझिशन घेतली. त्याचा इरादा माझ्या लक्षात आल्यानंतर दोन सेकंद वाट पाहिली. जसा केळीच्या बागेतून बाहेर दिसला त्या क्षणाला पहिली गोळी त्याच्या डोक्यावर झाडली. दुसरी गोळी तत्काळ पाच सेकंदाच्या आत छातीवर मारली, यावेळी तो बिबट्या कोसळला. शेवटची रिस्क नको म्हणून तिसरी गोळी मोठ्या बंदुकीतून मारली. दोन बंदुकांचा वापर करून बिबट्याचा वध झाला. यावेळी मी माझ्या मनावर ठेवलेले नियंत्रण व वेळीच केलेला लक्ष्यवेध उपयोगाला आला.
----
पत्रकार परिषदेसाठी जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, प्रा. शिवाजीराव बंडगर, सेनेचे उपजिल्हाप्रमुख भरत अवताडे, महिंद्र पाटील, जि. प. सदस्य बिभीषण आवटे, विशाल गायकवाड, अजित तळेकर उपस्थित होते.
लोकांना दहशतीतून बाहेर काढण्यासाठी केले धाडस
नरभक्षक बिबट्या हल्ला करताना कोण कुठल्या गटाचा, कोण कुठल्या पक्षाचा हे बघून हल्ला करत नव्हता. त्याच पद्धतीने ही मोहीम राबविताना माझ्या डोक्यात कसलेही राजकारण नव्हते. ज्या पद्धतीने बिबट्याने निष्पाप लोकांचे बळी घेतले, त्याच्या दहशतीमुळे शेतीची कामे बंद पडली, यातून जनतेला बाहेर काढण्यासाठी आपण हे धाडस केल्याचे धवलसिंहांनी सांगितले.
---
फोटो ओळी : करमाळ्यात पत्रकारांशी संवाद करताना धवलसिंह मोहिते-पाटील. शेजारी जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, भरत अवताडे.
===Photopath===
221220\22sol_2_22122020_4.jpg
===Caption===
करमाळयात पत्रकारांशी संवाद करताना धवलसिंह मोहिते-पाटील,शेजारी जि.प.अध्यक्ष अनिरूध्द कांबळे,भरत अवताडे.