सासू-सुनेने पारंपरिक तणावाचं नातं माय-लेकीच्या प्रेमळ नात्यात परावर्तित केलं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 11:48 AM2021-03-08T11:48:04+5:302021-03-08T11:48:11+5:30
सासू-सुनेच्या पांढऱ्या कपाळावर कर्तृत्वाची ललाटरेषा
प्रसाद पाटील
पानगाव : घरातील पिता-पुत्राच्या अकाली निधनानंतर कुटुंबावर मोठा आघात झाला. मात्र, हे दु:ख पेलत कापसेवाडी (ता. माढा) येथील सासू-सुनेने पारंपरिक तणावाचं नातं माय-लेकीच्या प्रेमळ नात्यात परावर्तित केलं. प्रत्येक प्रसंगाला सामोरे जात परिस्थितीला मात देत प्रगती साधली. चार एकर द्राक्षबागेसह बेदाणा व्यवसाय यशस्वी करून दाखविला.
संगीता अभिमान घोगरे (सासू), कल्पना लक्ष्मण घोगरे (सून) याच त्या जिद्दी सासू-सुना आहेत. कापसेवाडीतील अभिमान घोगरे व संगीता घोगरे या दाम्पत्याचे चौकोनी कुटुंब, मुलगा लक्ष्मण आणि सून कल्पना यांनी कष्टानं स्वमालकीच्या सहा एकराचे नंदनवन केले. वाढवत वाढवत तीन एकर द्राक्षबाग झाली. बाजारभावाच्या अनिश्चिततेने रस्त्यालगतच्या अर्ध्या एकरात एक बेदाणा शेड उभारले. कष्टाचं फळ मिळू लागले. कष्टानं दिवस जात होता. लक्ष्मण-कल्पना यांच्या संसारवेलीवर फुललेल्या रिया आणि सार्थक या नातवंडांसोबत दंगा करण्यात श्रमपरिहार होऊन रात्र आनंदात जात होती. मात्र, अचानक घात झाला अन् ऑक्टोबर २०१७ मध्ये बेदाणा शेड परिसरातच विजेच्या धक्क्याने लक्ष्मणचा मृत्यू झाला. हसत्या-खेळत्या घरातला कर्ता पुरुष निघून गेला. कष्टाने उभा केलेला प्रपंचाचा डोलारा, सून, लहानगी नातवंड सांभाळायची कशी? पण अभिमान आणि संगीता यांनी उतारवयातही बळ वाढवले. दु:खाला पाठीशी टाकले आणि हळूवारपणे सर्व गोष्टी हाताळत पुन्हा गाडी रुळावर आणली.
पण क्रूर नियतीला हे मान्यच नव्हतं. अर्धांगवायू होऊनही अभिमान कुटुंबासाठी कष्ट घेत होते, पण ऑगस्ट २०१९ मध्ये माढा रोडवर अपघातात त्यांचेही निधन झालं. कुटुंबातील कर्ता पुरुषच उरला नाही. या सासू-सुनेसमोर मोठे संकट आले. दोघींनीही बळ बांधले, दु:ख सावरले, कंबर कसली, सर्वच कामाची जबाबदारी आता दोघींवर होती. बागांची औषधे आणून बागेतील कामासाठीच्या कुशल मजुरांचे व्यवस्थापन करणे या बाबी सासूंनी उचलल्या, तर ट्रॅक्टर शिकून बागेतील मशागत, फवारण्या या जबाबदाऱ्या सुनेने उचलल्या. शिवाय मुलांच्या शिक्षणाकडेही दोघींनी लक्ष दिले.
शेतीबरोबरच दुग्ध व्यवसाय व शिवणकाम ही जबाबदारी पार पाडताना यासाठी गावकऱ्यांची सहानुभूती, नातेवाईकांची मदत आणि मानसिक आधार मिळत आहे. त्यामुळे आम्ही हरलो नाही.
-कल्पना घोगरे