चोरीची तक्रार आईनं दिली अन् तपासात मुलगा निघाला चोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:18 AM2020-12-25T04:18:17+5:302020-12-25T04:18:17+5:30
पंढरपूर : घरामध्ये लपवून ठेवलेल्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची तक्रार गोपाळपूर ...
पंढरपूर : घरामध्ये लपवून ठेवलेल्या सोन्या, चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ९२ हजार रुपयांचा मुद्देमाल पळवल्याची तक्रार गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील आईने मंगळवारी दिली अन् नेमके पोलीस तपासात मुलगाच चोर निघाल्याची माहिती पुढे आली आहे.
निर्मला प्रमोद जाधव (वय ५०, रा. मातोश्रीनगर, गोपाळपूर, ता. पंढरपूर) यांनी सोने-चांदी व पैसे एका स्टीलच्या डब्यामध्ये ठेवले होते. तो डब्बा घरामधील कापटाखाली ठवला. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून दरवाजा उघडून घरात प्रवेश करून सोने-चांदी ठेवलेल्या डब्बा चोरून नेला, अशी तक्रार निर्मला जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यांमध्ये २२ डिसेंबर रोजी केली होती. या तक्रारीनंतर पोलीस निरीक्षक किरण अवचार यांनी तपास चक्रे फिरवली. त्यानंतर पोलीस पथकाला घटनास्थळी पाठवले.
यानंतर निर्मला जाधव यांच्या घरातील इतर लोक बाहेर गेले असताना ओंकार प्रमोद जाधव (वय २०, रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर) हा घरात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. ओंकारला विश्वासात घेऊन सखोल तपासणी केली असता त्याने मोटारसायकलच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी घरातून पैसे व दागिने चोरल्याचे कबूल केले. त्यामुळे त्याला पोलिसांनी बुधवारी रात्री ताब्यात घेतले. त्याला गुरुवारी न्यायालयात हजर केले असता, एक दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.