पाणी टंचाईमुळे कॅनॉलवर गेलेल्या आईला डोळ्यासमोर गमवावी लागली मुलगी..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 12:52 PM2019-10-14T12:52:30+5:302019-10-14T12:56:08+5:30
कोंडी तांड्यावर शोककळा; नळाला नियमित पाणी आले असते तर ही वेळ आली नसती
संताजी शिंदे
सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी तांडा, गणेशनगर येथे नळाला नियमित पाणी येत नाही. पाणी टंचाईमुळे कॅनॉलला धुणे धुण्यासाठी गेलेल्या आईला आपली नऊ वर्षांची चिमुकली गमवावी लागली. या प्रकारामुळे कोंडी तांड्यावर शोककळा पसरली आहे.
रमेश राठोड व छाया रमेश राठोड हे पती-पत्नी कोंडी तांड्यावर राहण्यास आहेत. दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांना एक मुलगा, दोन मुली आहेत. मोठा मुलगा राहुल, दुसरी मुलगी खुशी आणि तिसरी मुलगी शुभांगी असा परिवार आहे. रमेश राठोड हे सकाळी नेहमीप्रमाणे कामाला निघून गेले. आई छाया ही कोजागरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला जाण्याची तयारी करीत होती. जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता ३ रीमध्ये शिकणारी शुभांगी दुपारी १२ वाजता शाळेतून घरी आली. दप्तर घरात ठेवून ती आईला मदत करू लागली. शेवटी राहिलेले धुणे धुण्यासाठी आई छाया ही जवळच असलेल्या कॅनॉलकडे निघाली. आईसोबत शुभांगी व तिची मोठी बहीण खुशी या दोघीही मदत करण्यासाठी निघाल्या. कॅनॉलवर दुपारी १ वाजता आल्या़ आई कडेला बसून धुणे धुवत होती. दोन्ही मुली कपड्याला साबण लावून देत होत्या.
बराच वेळ एका ठिकाणी बसलेली शुभांगी जागा बदलण्यासाठी १.३0 वाजता उठली. बाजूला जात असताना तिचा पाय साबणावर पडला. ती घसरून थेट कॅनॉलमध्ये पडली. पाणी खोल होते़ आईला पोहता येत नव्हतं़ मुलगी पडल्याचे पाहताच तिने मदतीसाठी आजूबाजूच्या लोकांना ओरडण्यास सुरूवात केली. आई छाया यांचा आवाज ऐकून शेतात काम करणारे राजू राठोड हे धावत आले. मुलगी पाण्यात पडल्याचे समजताच त्यांनी उडी मारली. शुभांगी सापडत नव्हती़ त्यांनी आणखी काही लोकांना आवाज दिला. १0 ते १२ तरूण धावत कॅनॉलच्या दिशेने आले. पाण्यात उतरून शुभांगीचा शोध घेतला. पाण्याला वेग होता, अर्धा किलोमीटरपर्यंत तिचा शोध घेतला. शुभांगी पाण्यातील चटईसारख्या कापडात अडकून वाहत जात असताना एका तरूणाच्या हाती लागली. तिला बाहेर काढून तत्काळ सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र शुभांगीचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
शुभांगीचे आई-वडील सकाळी झाले गायब...
- शुभांगी हिच्यावर शनिवारी रात्री तांड्याजवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. घरी आल्यानंतर दोघा पती-पत्नीला रात्रभर झोप आली नाही. हसत खेळत अंगणात आणि अंगाखांद्यावर बागडणारी मुलगी अचानक गेल्याने दोघांवर आभाळ कोसळलं़ नातेवाईक सकाळी उठले़ रमेश व छाया हे दोघे घरात नव्हते. अचानक दोघे गायब झाल्याने नातेवाईक घाबरले. दोघांचा शोध घेऊ लागले़ बराच वेळ दोघे कुठेही सापडत नव्हते. सकाळी सात वाजता एका व्यक्तीने निरोप दिला की दोघे स्मशानभूमीत आहेत. नातेवाईक स्मशानभूमीत गेले तेव्हा दोघे पती-पत्नी शुभांगीचा अंत्यसंस्कार झालेल्या ठिकाणी बसून मोठमोठ्याने रडत होते.
तांड्याला पाण्याची मोठी टंचाई आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आम्हाला वणवण भटकंती करावी लागते. ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी येत नाही. नळाला नियमित पाणी आले असते तर धुण्यासाठी कॅनॉलवर जाण्याची आवश्यकता लागली नसती. शुभांगीसारखी चिमुकली हातून गेली नसती. संरक्षणाच्या दृष्टीने कॅनॉलला जाळी बसवण्यात यावी.
- राजू राठोड, नातेवाईक