मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र

By admin | Published: December 26, 2014 09:42 PM2014-12-26T21:42:42+5:302014-12-26T23:56:36+5:30

कोल्हापुरात उपचार : अचानक हात-पाय लुळे पडलेल्या प्रथमेशची कहाणी

The mother sold her for the child's treatment | मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र

मुलाच्या उपचारासाठी आईने विकले मंगळसूत्र

Next

रवींद्र हिडदुगी - नेसरी -पुढील उपचारासाठी मुलाला दोन लाखांवर खर्च येणार आहे. त्याला मुंबईला घेऊन जावा, असा सल्ला डॉक्टरांकडून मिळताच सोबत असणाऱ्या आई व आजीचे हात-पाय गळाले. काही सुचेनासे झाले. मुंबईला न जाता तिने कोल्हापूरचे एक खासगी हॉस्पिटल गाठले. तेथे तातडीच्या इंजेक्शनसाठी १३ हजारांची जोडणा करा, असे सांगताच हताश झालेल्या आईने मंगळसूत्र व कर्णफुले विकण्याचा निर्णय घेतला.
कोल्हापूर येथील सराफ गुजरीत आपले दागिने विकण्यासाठी गेले असता त्यांना कुठल्याही सराफाने जवळ केले नाही. शिवाय हे दागिने चोरीचे असल्याचाही काहींनी संशय व्यक्त केला. मुलाच्या उपचारासाठी तिने शेवटी माहेर गाठले आणि ओळखीच्या सराफाकडे जाऊन आपले मंगळसूत्र, कर्णफुले १३ हजारांना विकले अन् मुलासाठी जीव कासावीस झालेल्या आईने पुन्हा कोल्हापूर गाठले.
ही करुण कहाणी आहे प्रथमेश प्रदीप कांबळे या सात वर्षांच्या बालकाची. त्याचे मूळ गाव भैरेवाडी असून, त्याचे आजोळ नेसरी आहे. पंधरा दिवसांपूर्वी तो आजोळी नेसरी येथे आईसोबत आला होता. त्याला अचानक उलट्या सुरू झाल्याने खासगी डॉक्टरांनी उपचार केले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. दोनच दिवसांत पळणारा, दौडणारा प्रथमेश थांबला. त्याचे हात-पाय लुळे पडले. त्याचे चालायचे बंद झाले.
भयभीत होऊन आई निर्मलाने मुलाला नेसरी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, परिस्थिती गंभीर असल्याने डॉ. गवळी, डॉ. अनिरुद्ध कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांनी त्याला कोल्हापूर सीपीआर येथे नेण्याचा निर्णय घेतला. शासकीय रुग्णवाहिकेने त्याला सीपीआरमध्ये दाखल केले.
तेथे त्याची तपासणी केली असता जीबीएस (गीयाबार सिंड्रोम) हा दुर्मीळ आजार झाल्याचे निदान झाले. पुढील उपचारासाठी दोन लाखांवर खर्च अपेक्षित असल्याचे सांगून प्रथमेशला मुंबईला घेऊन जाण्याचा सल्ला दिला होता.
दरम्यान, या दुर्मीळ आजाराचे निदान झाल्याचे कळताच डॉक्टरांसह नेसरीकरांनी प्रथमेशच्या उपचारासाठी धडपड सुरू केली. दानशूर व्यक्ती, संस्था यांना घेऊन बरीचशी रक्कम गोळा केली. शालेय विद्यार्थ्यांनी तर आपल्या खाऊचे पैसे जमा करून हातभार लावला.
सर्व शाळा, महाविद्यालयासह गडहिंग्लज येथील प्रा. अरविंद कुलकर्णी यांच्या पुढाकाराने गडहिंग्लज येथेही समाधानकारक रक्कम गोळा झाली.
नेसरी ग्रामपंचायतीने तर तातडीने बैठक घेऊन मदत गोळा करण्यास मोलाची साथ दिली. त्यासाठी बँक आॅफ इंडिया येथे मदतीसाठी बचत खाते सुरू केले. तेथे दानशूर व्यक्ती, संस्था मदत जमा करीत आहेत.


डॉक्टरांनीच घेतला पुढाकार
रुग्णांना एरव्ही पुढील उपचाराचा सल्ला देऊन आपल्या कामात गुंतणाऱ्या डॉक्टरांनी मात्र प्रथमेशच्या मदतीसाठी सक्रिय सहभाग घेतल्याने डॉ. गवळी, डॉ. कुलकर्णी व डॉ. सत्यजित देसाई यांच्याबाबत नागरिकांत कमालीचे समाधान व्यक्त होत आहे.
प्रथमेशवर डॉ. वसगावकर व डॉ. परुळेकर या डॉक्टरांनी प्रयत्न चालविले आहेत. तो आता धोक्याच्या इशाऱ्यातून बाहेर आला असून, काही दिवसांत चालायला लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: The mother sold her for the child's treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.