धुणी-भांडी करत आईनं शिकवलं; मुलीनं मिळवलं दहावीत मोठं यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2020 12:26 PM2020-07-30T12:26:03+5:302020-07-30T12:28:08+5:30
इंग्रजीवर प्रभुत्व असलेल्या दहावी उत्तीर्ण श्वेताला बनायचंय डॉक्टर
सोलापूर : वडिलांचे छत्र हरपलेले असताना आईने धुणी-भांडी करून मुलीला शिकविले. मुलीने दहावीत ८६ टक्के गुण मिळवून यश मिळविले. बिकट परिस्थितीत जिद्दीने अभ्यास करत श्वेता हिने तिच्या आईची मान उंचावली.
श्वेता जानकीराम सिंग्राल ही कुमठा नाका परिसरातील बालभारती विद्यालयातून दहावी उत्तीर्ण झाली आहे. कुमठा नाका, नागेंद्र नगर परिसरात कामगार वसाहतीत ती रहाते. ती फक्त उत्तीर्ण झाली नसून ८६ टक्के गुण मिळवून ती शाळेमध्ये दुसरी आली आहे. आपल्या या यशाचे श्रेय तिने आई आणि शाळेतील शिक्षकांना दिले आहे. शाळा तसेच तिच्या घराच्या परिसरातील लोक श्वेताच्या या यशाचे कौतुक करत आहेत.
अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतही श्वेताने जिद्दीने अभ्यास केला. पाच वर्षांपूर्वी श्वेताच्या वडिलांचे निधन झाले. यातून सावरत ती तिच्या मामाकडे राहून शिक्षण पूर्ण करत आहे. तिचे मामा हे दिव्यांग आहेत. तरीदेखील ते श्वेताच्या शिक्षणात मदत करतात. आपल्या मुलीने शिकून मोठं व्हावं, या उद्देशाने आई श्वेताला शिकवत आहे. खासगी शिकवणी न लावता श्वेताने अभ्यास केला. तिला इंग्रजीची आवड असून, तिचे भाषेवर प्रभुत्व आहे. अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन तिला डॉक्टर बनायचे आहे. ती आपल्या यशाचे श्रेय आई आणि विद्यालयातील सर्व शिक्षकांना देते. श्वेताची बहीण देखील बालभारती शाळेमध्ये इयत्ता आठवीत शिकत असून ती देखील श्वेतासारखी हुशार आहे.