आई देवाघरी गेली; कोरोनाग्रस्त मुलाचे ग्रामस्थांनी पालकत्व स्वीकारले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:17 AM2021-05-28T04:17:46+5:302021-05-28T04:17:46+5:30

त्याचं झालं असं, चोपडी गावात दत्तात्रय मधुकर सुतार व त्याची आई सुतार गल्लीत राहत होते. माय-लेक दोघंच करून खात ...

Mother went to God's house; The villagers accepted custody of the coronated child | आई देवाघरी गेली; कोरोनाग्रस्त मुलाचे ग्रामस्थांनी पालकत्व स्वीकारले

आई देवाघरी गेली; कोरोनाग्रस्त मुलाचे ग्रामस्थांनी पालकत्व स्वीकारले

Next

त्याचं झालं असं, चोपडी गावात दत्तात्रय मधुकर सुतार व त्याची आई सुतार गल्लीत राहत होते. माय-लेक दोघंच करून खात होते. परंतु २० दिवसांपूर्वी कोरोनाच्या विळख्यात आईने जीव सोडला आणि थोडासा भोळा अन‌् लाजरा असणारा ४५ वर्षांचा दत्तात्रय एकटा पडला. आईच्या निधनानंतर दोन-चार दिवसाने त्यालाही कोरोनाची लागण झाली. औषधोपचार चालूच होते. त्याचे चुलते अर्जुन सुतार व चुलतभाऊ बाळासाहेब सुतार त्याचा सांभाळ करीत होते. जास्त त्रास नसल्याने होमआयसोलेशनमध्ये उपचार सुरू होते. परंतु कोरोना झाल्यानंतर ८व्या दिवशी त्याची तब्येत अचानक बिघडली. ऑक्सिजनची लेव्हल कमी होऊ लागली. ही बाब गावातील कोविड टास्क फोर्सच्या लक्षात आली. त्यांनी तत्काळ उपचारासाठी प्रयत्न सुरू केले.

दुसऱ्याच दिवशी त्याला मेडशिंगी येथील कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले होते. परंतु दत्तात्रय याचा एचआरसीटीचा स्कोर जास्त असल्याने त्यास खासगी रुग्णालयात दाखल करणे गरजेचे होते. खासगी रुग्णालयात दाखल करायचे म्हटले तर उपचारासाठी लागणाऱ्या पैशांची तजवीज करणे अत्यावश्यक होते. म्हणूनच कोविड टास्क फोर्सने ‘मिशन माणुसकी’ या संकल्पनेतून निराधार दत्तात्रयच्या दवाखान्याच्या खर्चासाठी गावातील विविध ग्रुपवर गणेश बाबर, सुनील जवंजाळ, पतंगराव बाबर, जनार्दन बाबर यांनी मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत अवघ्या एका दिवसातच उपचारासाठी जवळपास ५० हजार रुपये जमा झाले. काही तासातच चोपडीकरांनी ‘मिशन माणुसकी’ यशस्वी केले. मिशन माणुसकी यशस्वी करण्यामध्ये चोपडी गावकर्‍यांबरोबरच डॉ. चंद्रकला बाबर, कोरोना योद्धा जि. प. सदस्य अतुल पवार यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले.

मदतीचा झाला वर्षाव

या सत्कार्यात आपला सहभाग असावा या उदात्त हेतूने चोपडीकरांनी यात हिरीरीने सहभाग घेतला. कुणी १००, कुणी ५ हजार दिले. खरं तर कुणी किती पैसे दिले याहीपेक्षा गावातल्या निराधार व्यक्तीसाठी माझे पैसे कामाला येत आहेत ही दातृत्वाची भावना ‘मिशन माणुसकी’मध्ये खूप मोठी दिसून आली. यामध्ये सैन्यदलात कार्यरत असणारे तरुण, पोलीस दलात काम करणारे, देशभर विखुरलेले गलाई बांधव, सोबतच नोकरी व्यवसायानिमित्त मुंबई-पुण्यामध्ये तसेच इतर ठिकाणी असणाऱ्या चोपडीकरांचाही सहभाग होता.

कोट :::::::::::::

गावाने कोरोनातून वाचवल्यामुळेच मी संकटातून सुखरूप बाहेर पडू शकलो. कोरोनामुळे माझा सांभाळ करणारी माझी आई देवाघरी गेली. परंतु गावाच्या रूपाने मला दुसरी आई भेटल्याचा मनस्वी आनंद झाला आहे. चोपडी ग्रामस्थांच्या ऋणातून मुक्त होण्याची संधी या जन्मीच मिळावी हीच परमेश्वराकडे प्रार्थना करतो.

- दत्तात्रय सुतार

कोरोनामुक्त रुग्ण

Web Title: Mother went to God's house; The villagers accepted custody of the coronated child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.