आईच्या अस्थींचे पाण्यात विसर्जन न करता शेतात केले विसर्जन, त्याच ठिकाणी केले वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 02:37 PM2017-10-18T14:37:41+5:302017-10-18T14:41:31+5:30
वडवळ (ता मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात केले असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण देखील करून आईची स्मृती तर अखंड जवळ ठेवलीच पण पर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्र देखील घालून दिला.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर/ वडवळ दि १८ : मनुष्य जन्मापासून मरेपर्यंत विविध संस्कार पार पाडले जातात़ त्यातील अंत्यसंस्कार हा खूपच भावनिक संस्कार असतो़ मात्र याच अंत्यसंस्कारवर वडवळ (ता मोहोळ) येथील एका शेतकरी पुत्राने आपल्या दिवंगत आईच्या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता आपल्या शेतात केले असून त्याच ठिकाणी वृक्षारोपण देखील करून आईची स्मृती तर अखंड जवळ ठेवलीच पण पर्यावरण रक्षण करण्याचा नवीन मंत्र देखील घालून दिला.
हणमंत श्रीरंग मोरे हे त्या शेतकºयांचे नाव असून त्यांची आई शकुंतला (वय ८९) यांचे रविवारी निधन झाले़ प्रथेप्रमाणे मंगळवार हा तिसरा दिवस होता यादिवशी अस्थी, राख याचे विसर्जन करण्याची प्रथा लांबोटी येथील सीना किंवा पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत करण्याची आजवरची प्रथा होती. मात्र या अस्थींचे विसर्जन पाण्यात न करता शेतात खड्डे घेऊन त्याच ठिकाणी याचे विसर्जन करावे अशी विनंती तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष मनोज मोरे, सखाराम मोरे यांनी हणमंत मोरे यांच्या कडे केली ही विनंती मोरे याना देखील पटली आपल्या कुटुंबियांशी चर्चा करून त्यांनी शेतात जाऊन या अस्थी विसर्जित करण्याचा निर्णय घेतला २ खड्डे घेऊन त्यात या अस्थी विसर्जित करून त्यावर वृक्षारोपण केले शेतात या ठिकाणी कोणतीही समाधी न बांधता या वृक्षांची काळजी घेऊन हीच झाडे जतन करणार असून आईची स्मृती कायम डोळ्या समोर राहणार असल्याचे हणमंत मोरे यांनी सांगितले.
-------------
ज्या आईने हे जग दाखवले तिच्या मृत्य पश्चात तिच्या अस्थी तरी माझ्यापासून इतक्या लांब का विसर्जीत कराव्यात, माझ्या शेतातच झाडांच्या रूपाने आईचे अस्तित्व मला जाणवणार आहे या झाडांची आई प्रमाणेच काळजी घेणार आहे"
- हणमंत मोरे
शेतकरी वडवऴ