सोलापूर विद्यापीठाचा श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठाशी सामंजस्य करार
By बाळकृष्ण दोड्डी | Published: March 2, 2023 03:26 PM2023-03-02T15:26:13+5:302023-03-02T15:26:45+5:30
श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठातील सामाजिक विज्ञान विद्याशाखेच्या भूगोल विभागाने पुढाकार घेऊन दक्षिण आशियाई देशांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि श्रीलंकेच्या कोलोम्बो येथील केलानिया विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. या करारामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय संबंध मजबूत होतील आणि विद्यार्थ्यांना त्याचा करिअरमध्ये निश्चित फायदा होईल, असा विश्वास कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
श्रीलंकेच्या केलानिया विद्यापीठातील सामाजिक विज्ञान विद्याशाखेच्या भूगोल विभागाने पुढाकार घेऊन दक्षिण आशियाई देशांचा समावेश करून आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये केलानिया विद्यापीठ, कोलोम्बो आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी भारतीय उच्च आयोगाचे गोपाल बागले, केलनिया विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. निलांथी डी सिल्वा आणि कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस,सोलापूर विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्राचे विभाग प्रमुख डॉ. विनायक धुळप, प्रा. लाल मेर्वीन धर्मासरी, प्रा. ए. जि. अमरसिंघे आणि प्रा. एम. एम. गुणथीलके आदी उपस्थित होते.