कोवळ्या उन्हात रंगला माऊलींचा दुसरा रिंगण सोहळा
By admin | Published: July 1, 2017 11:48 AM2017-07-01T11:48:41+5:302017-07-01T11:48:41+5:30
आॅनलाइन लोकमत सोलापूर
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर : गोपालकृष्ण मांडवकर
पुरंदावडे येथे झालेल्या माऊलींच्या पहिल्या गोल रिंगण सोहळ्याची ऊर्मी ताजी असतानाच शुक्रवारी सकाळी ९ वाजता खुडूस फाटा येथे दुसरा रिंगण सोहळा पार पडला. सूर्यनारायणाच्या कोवळ्या उन्हात माऊलींच्या अश्वांनी बेफाम दौड करून पाच रिंगण पूर्ण केले. ‘हरी विठ्ठल...’ ‘माऊली... माऊली...’च्या गजराने आसमंत निनादले. जणू चैतन्याचा सागरच वारकऱ्यांच्या अलोट जनसागरावर पसरला.
माळशिरसवरून सकाळी ६ वाजता माऊलींची पालखी मार्गस्थ झाली. आषाढ शुद्ध सप्तमी हा माऊलींच्या दुसऱ्या गोल रिंगणाचा दिवस असतो. माळशिरस ते खुडूस फाटा हे साडेचार किलोमीटरचे अंतर पूर्ण करून माऊलींची पालखी खुडूस फाट्याच्या मैदानावर पोहोचली तेव्हा दिंड्या आणि भाविकांनी आधीच मैदान फुलून गेले होते. गोल रिंगणाच्या आखणीनुसार मानाच्या दिंड्यांनंतर पालखीने रिंगणाला प्रदक्षिणा घालून आत प्रवेश केला. रिंगणातील स्थळावर माऊली विराजित झाल्यावर अश्व सज्ज झाले. तत्पूर्वी रिंगणाच्या मार्गावर सुशोभित रांगोळ्याही घालून झाल्या होत्या. अगदी साडेनऊ वाजता रिंगण सोहळा सुरू झाला. प्रारंभी स्वाराने हाती भगवा ध्वज उंच धरून रिंगण घातले. त्यानंतर माऊलींच्या अश्वाने एकापाठोपाठ पाच रिंगण पूर्ण केले. विठुनामाचा गजर, माऊली... माऊली... असे वारकऱ्यांच्या मुखातील अखंड उच्चारण आणि टाळ-मृदंगाच्या गजरात हा रिंगण सोहळा कधी पूर्ण झाला हे कळलेच नाही. खुडूसमधील माऊली पालखीच्या रिंगण सोहळ्याला लक्षावधी भाविक उपस्थित होते. पूर्णत: शिस्तीत चालणारा हा सोहळा आणि सहभागी वारकऱ्यांनी घडविलेले एकसंधतेचे दर्शन सुखावून गेले.
------------------------------
वारकऱ्यांना मिळाली ऊर्जा
४मंत्रमुग्ध झालेल्या लक्षावधी भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या या सोहळ्यानंतर दिंड्यांचा उडीचा खेळ सुरू झाला. पहिल्या गोल रिंगणाबरोबरच आजही दिंड्यांनी माऊलींच्या पालखीभोवती फेर धरला. झेंडेकरी, टाळकरी, मृदंगवादक, वीणेकरी आणि त्यामागे वृंदावनधारी महिलांचा फेर रंगला. ‘ग्यानबा तुकाराम’ जयघोषांनी आसमंत दुमदुमून गेले होते. तब्बल अर्धा तास रंगलेल्या उडीच्या खेळाने वारकऱ्यांना नवी ऊर्जा मिळाली.