कुर्डूच्या माळकरी घराण्यावर दु:खाचा डोंगर, एकाच आठवड्यात तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:25 AM2021-09-24T04:25:41+5:302021-09-24T04:25:41+5:30
कुर्डू, ता. माढा येथील शिवाजी अंबादास हांडे (वय ६०) यांचे कोरानावरील उपचार घेत असताना पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात ...
कुर्डू, ता. माढा येथील शिवाजी अंबादास हांडे (वय ६०) यांचे कोरानावरील उपचार घेत असताना पंढरपूर येथील एका खासगी रुग्णालयात रविवारी १९ सप्टेंबर रोजी अचानक निधन झाले. त्यांचा तिसऱ्या दिवशीचा सावडण्याचा विधी करण्यासाठी मंगळवारी २१ सप्टेंबर रोजी सकाळी त्यांच्या राहत्या घराजवळ हांडे वस्तीवर पाहुणे-राहुळे व नागरिक जमले होते. आपल्या पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने त्यांची पत्नी राहीबाई शिवाजी हांडे (वय ५२) यांनाही अचानकपणे पतीच्या सावडण्याच्या विधी अगोदर काही क्षण अचानकपणे तीव्र स्वरूपाचा हदयविकाराचा झटका झाला. त्यात त्यांचाही जागीच मृत्यू झाल्याची विचित्र घटना घडली आहे. दुर्दैव म्हणजे १५ सप्टेंबर रोजी मयत शिवाजी हांडे यांचे थोरले बंधू अजिनाथ अंबादास हांडे (वय ७२) यांचेही निधन झाले. ही घटना ताजी असतानाच अवघ्या पाच दिवसांनंतरच लहान बंधू शिवाजी यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या पत्नी राहीबाई यांचाही त्यांच्या तिसऱ्या दिवशीच मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. सात दिवसांत एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती मरण पावल्याने घराबरोबरच संपूर्ण कुर्डू गाव व परिसरावर शोककळा पसरलेली आहे. अजिनाथ हांडे यांच्या पश्चात दोन भाऊ, दोन मुले, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते लोकसेवा पतसंस्थेचे अध्यक्ष रामहारी हांडे यांचे वडील होत. तर शिवाजी हांडे व राहीबाई हांडे यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
........................
लेकीला वडिलानंतर आईची भेट झाली नाही
मयत शिवाजी हांडे यांच्या अंत्यविधीला येऊ न शकणारी त्यांची धाकटी मुलगी तिसऱ्याच्या कार्यक्रमाला सकाळी लवकर पोहच झाली होती. त्यावेळी तिला आपली आई आताच मयत झाली, हे माहितीच नव्हते. जेव्हा तिच्या वडिलांच्या राखेच्या शेजारी दुसऱ्या एका अंत्यविधीसाठीची तयारी केल्याचे पाहून ती अचंबित झाले व हे कशासाठी केलं आहे. तिला समजेना. त्यानंतर मात्र काही क्षणातच तिच्या आईचे पार्थिव तिथे आणण्यात आले आणि मुलीने ते पाहिले आणि एकच हंबरडा फोडला. वडिलांच्या नंतर आपल्या आईला ती भेटू शकली नव्हती. त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
.........
फोटो तीन आहेत