दुष्काळग्रस्त जिल्हा जाहीर करण्यासाठी जनावरे घेऊन भिमा नदीपात्रात आंदोलन
By दिपक दुपारगुडे | Published: August 23, 2023 01:03 PM2023-08-23T13:03:45+5:302023-08-23T13:03:58+5:30
उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे.
सोलापूर : उजनीतून भीमा नदीत आणि उजवा व डाव्या कालव्यात पाणी सोडा आणि सोलापूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाच्या युवा सेनेच्यावतीने माळशिरस तालुक्यातील संगम येथे भीमा नदीच्या कोरड्या पात्रात जनावरे सोबत घेऊन आंदोलन केले.
उशाला धरण, पायथ्याला नदी... बाजूला कालवा तरीही गावे पाण्यावाचून उपाशी असे म्हणण्याची वेळ आली आहे. उजनी धरण, भिमा नदी व उजवा व डावा कालवा कधी काळी सोलापूर जिल्हासाठी जीवनदायिनी ठरलेली व लाखो एकर शेतीला पाणीपुरवठा करून परिसर सुजलाम सुफलाम करणार्या नदीचे पात्र ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप कोरडेच पडले आहे. यामुळे भीमेच्या पाण्यावर अवलंबून असलेली परिसरातील हजारो हेक्टर शेती व नदीकाठच्या गावांच्या पाणी प्रश्न निर्माण झाला आहे. ऊस, फळबागा, चारा व इतर,पिकांबरोबरच दुष्काळासारखी दाहकता प्रकर्षाने जाणवू लागली आहे. परंतु उजनी पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका शेतकऱ्यांना आत्ता बसताना दिसत आहे. काहीही करून उजनी धरणातील पाणी भीमा नदीच्या पात्रात व कालव्यात सोडणे आवश्यक आहेत. तसेच दुष्काळ जाहीर करून शेतकर्यांना मदत देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे, नामदेव पराडे, दत्ता साळुंखे, गणेश भिताडे, सागर साळुंखे, मगन भोई, मुकुंद गायकवाड, हरिदास पराडे, देविदास इंगळे, बबन पराडे, लाला भोई, अशोक भोई, सोमनाथ भोई, महादेव पराडे, गोवर्धन भोई, बापू भोई, सोमनाथ इंगळे, अर्जुन लांवड, अंकुश इंगळे, आकाश पराडे, प्रवीण पराडे आदी उपस्थित होते.