दोनशे फुट टाकीवर चढून युवकाचं आंदोलन; मराठा आरक्षणासाठी रानमसलेत अन्नत्याग
By Appasaheb.patil | Published: October 31, 2023 01:20 PM2023-10-31T13:20:26+5:302023-10-31T13:21:08+5:30
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत.
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी आंदोलनं होत आहेत. मंगळवारी सकाळपासून आंदोलन सोलापुरात तीव्र झाले आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील रानमसले येथील शिवाजी परमेश्वर गरड या युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील दोनशे फुट उंच असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या अनोख्या शोले स्टाईल आंदोलनामुळे हे आंदोलन चांगलेच चर्चेत आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सोलापुरातील जिल्हा परिषद गेटसमोर सकल मराठा समाजाच्यावतीने साखळी उपोषण सुरु आहे. या उपोषणाला अनेक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधींनी पाठिंबा दिला आहे. मंगळवारी सकाळपासून शहरात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत. आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकले. सोलापूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल रोको आंदोलन करण्यात आले.
दरम्यान, उत्तर सोलापूर तालुक्यातील विविध गावात मराठा समाजाच्यावतीने आंदोलन सुरू आहे. गावडी दारफळ, नान्नज, वडाळा, बीबीदारफळ, कारंबा, गुळवंची, अकोलेकाटी, मार्डीसह अन्य गावातही आंदोलन सुरू आहे. नान्नज येथे सकाळी रस्त्यावर टायर पेटविण्यात आले होते. सकाळी दहा वाजता रानमसले येथील परमेश्वर गरड या युवकाने अनोखे आंदोलन करून सर्वांचे लक्ष वेधले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे.