रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2021 17:28 IST2021-11-18T17:28:49+5:302021-11-18T17:28:53+5:30
२९ नोव्हेंबरला बैठक : चिमणीसह इतर अडथळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली माहिती

रखडलेल्या सोलापूरच्या विमानसेवेसाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली
सोलापूर : होटगी रस्त्यावरील बंद असलेली विमानसेवा पूर्ववत करण्यासाठी आता केंद्रीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत. सोलापूरच्या विमानसेवा प्रश्नी केंद्रीय सचिवांची २९ नाेव्हेंबर रोजी बैठक घेणार आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी शंभरकर तसेच मनपा आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित राहणार आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शंभरकर यांनी बुधवारी सायंकाळी मनपा आयुक्त, विमान प्राधिकारण तसेच इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन अडथळ्यांची माहिती संकलित केली.
२०१४ साली विमान प्राधिकरणाने विमानसेवेला अडथळा ठरत असलेल्या चिमणीसह इतर बाबींची माहिती सरकारला दिली. या प्रश्नी जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांकडून कारवाई होणे अपेक्षित होते. अद्याप चिमणी हटविली नाही. इतर २५ अडथळेही तशीच आहेत. ५ टोलेजंग इमारती, मोबाईल टॉवर तसेच काही वृक्ष हटविणे अपेक्षित होते. अडथळे दूर होत नसल्याने सोलापूरला विमानसेवा सुरू करता येणार नाही, असे विमान प्राधिकरणाने केंद्र सरकारला पुन्हा कळविले. त्यानंतर केंद्रीय पातळीवर याबाबत विचारणा सुरू झाली. केंद्र सरकारने जिल्हा प्रशासनाला याबाबत विचारले असून २९ नोव्हेंबरला याबाबत माहिती सादर करण्याची सूचना केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तयारी करीत आहेत.