सोलापूरच्या खासदारांनी घेतली उपमुख्यमंत्र्यांची भेट; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: November 3, 2023 04:09 PM2023-11-03T16:09:24+5:302023-11-03T16:10:49+5:30
सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अत्यल्प पावसाने शेतकरी, जनावरांच्या पिण्याच्या प्रश्न गंभीर झाला आहे. पावसाअभावी काही ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत तर पेरण्या झालेल्या पिकांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याचे निवेदन खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.
सोलापूर जिल्हा हा प्रमुख कृषी उत्पादक म्हणून प्रसिध्द आहे. विशेषतः डाळिंब, केळी , द्राक्षे इ. फलोत्पादनाचे वाढते उत्पादन लक्षात घेता सोलापूर हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. खरीप आणि रबी हंगामातील पिकांचे उत्पादन ही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु, चालू वर्षी सोलापूर लोकसभा मतदार संघातील अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा, पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर या तालुक्यात सरासरी ही पाऊस न झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिकांची परिस्थिती उत्तम नसल्याने पाण्याअभावी पिके जळून जात आहेत.
दरम्यान, येणाऱ्या दिवाळी सणाच्या तोंडावर सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात अडकला आहे. उजनी धरणाच्या जलसाठ्यात ही वाढ नसल्याने सिंचनावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना विशेषतः मोठ्या संख्येने असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी अधिक संकटग्रस्त झाला आहे. तसेच सोलापूर शहराच्या पाणी पुरवठ्याचे ही संकट येणाऱ्या काळात उभे राहणार आहे. त्यामुळे या मागणीचा विचार करून सोलापूर जिल्हा अवर्षणग्रस्त जाहीर करण्याची मागणी खा. डॉ. जयसिध्देश्वर महास्वामीजी यांनी केली.